BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२४ डिसें, २०२१

विषबाधा ! दुकानातील खाऊने दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू !

 



मंगळवेढा : दुकानातून आणलेल्या खाऊमुळे दोन सख्ख्या आणि चिमुकल्या बहिणींचा विषबाधा होऊन मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना तालुक्यातील मरवडे या गावी घडली असून संपूर्ण गाव शोकमग्न झाले आहे. 


सोलापूर जिल्ह्यातील अन्न भेसळ प्रतिबंधक केवळ दाखविण्यापुरती कारवाई करते अशा तक्रारी नेहमीच नागरीकातून होत असतात. दुकानदार आपल्या आर्थिक लाभासाठी ग्राहकांच्या जीवाची परवा करीत नसल्याचे नेहमी अनुभवला येत असते पण त्यांच्यावर कुणाचेच नियंत्रण नसते. अन्न व औषध प्रशासन कधीतरी मधूनच जागे होते आणि काही दुकानावर कारवाई करून आपली जबाबदारी संपली असल्याचे त्यांना वाटते. दुकानातून आणि हॉटेलातून सर्रास भेसळीचे पदार्थ विकले जातात आणि अशाच प्रकारातून मरवडे येथील दोन चिमुकल्या बहिणींना आपला जीव गमवावा लागला आहे. 


मरवडे येथील अवघ्या ६ वर्षे वयाच्या भक्ती आबासाहेब चव्हाण आई ४ वर्षे वयाच्या नम्रता आबासाहेब चव्हाण या दोन बहिणींना खाऊतून झालेल्या विषबाधेतून जीव गमवावा लागला आहे. वडील आबासाहेब चव्हाण यांनी मोठ्या लाडाने आपल्या दोन चिमुकल्या मुलींसाठी मंगळवेढा येथील दुकानातून मंगळवारी खाऊ आणला होता. हा खाऊ या मुलीनी आणि इतरांनीही खाल्ला. हा खाऊ खाल्यानंतर सर्वांनाच अस्वस्थ वाटू लागले. ही अस्वस्थता नेहमीपेक्षा वेगळी जाणवू लागल्याने सगळेच रुग्णालयात पोहोचले. यातील काही मंगळवेढा येथील तर काही पंढरपूर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले. 


रुग्णालयात उपचार सुरु असतानाच मंगळवेढा येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेली सहा वर्षीय भक्ती आबासाहेब चव्हाण हिचा मृत्यू झाला तर पंढरपूर येथे उपचार घेत असलेली चार वर्षे वयाची नम्रता हिचा देखील मृत्यू झाला. नम्रता ही बालवाडीत तर भक्ती ही मरवडे येथील शाळेत पहिल्या इयत्तेत शिकत होती. या दोन्ही मुली सर्वांच्या अत्यंत लाडक्या होत्या. दोन्ही मुलींच्या मृत्यूची खबर गावात पोहोचताच संपूर्ण गाव शोकाकुल झाले आहे. या दोन्ही मुलींचे वडील आबासाहेब चव्हाण याना आणी त्यांची पत्नी सुषमा यांनाही याच खाऊतून विषबाधा झाली असून  हे दोघेही रुग्णालयात उपचार घेत आहेत. या घटनेने अत्यंत दु:ख व्यक्त होत असतानाच भेसळीच्या प्रकारामुळे संतापाचे जोरदार पडसाद उमटू लागले आहेत. 


हे देखील वाचा :>>>      पुन्हा संचारबंदी ! कोरोनाचे रुग्ण वाढू लागले !



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !