BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

९ डिसें, २०२१

माजी आमदारांना दोन लबाड कोल्ह्यांनी घातला गंडा !

 



सांगली : माजी आमदारांची असहायता ओळखून दोन कोल्ह्यांनी मिळून  परशुराम उपरकर यांची मोठी फसवणूक करीत कठीण काळातही गंडा घातल्याची बाब समोर आली असून याबाबत उपरकर यांनी पोलिसात धाव घेतली आहे. 

कुणी संकटात आहे हे पाहून मानवतावादाची जपणूक करीत माणूस माणसांच्या मदतीला धावून जातो पण येथे मात्र वेगळेच घडले असून संकटात असलेल्या माजी आमदार परशुराम उपरकर यांना दोन लबाडांनी फसवणूक करीत दहा लाखाला गंडा घातला आहे.  दोन्ही भामट्यांच्या विरोधात मिरज पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे पण ज्या प्रकारे फसवणूक करण्यात आली त्याबाबत मात्र प्रचंड संताप व्यक्त होत आहे. उपरकर यांच्यासारख्या आक्रमक नेत्यालाही टोपी घालताना भामट्यांनी मागे पुढे पाहिले नाही. 

कणकवलीचे माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या दोन्ही किडन्या निकामी झालेल्या आहेत, उपरकर हे किडनी प्रत्यारोपण करण्याच्या प्रयत्नात आहेत. गेल्या चार वर्षांपासून ते मिरज येथील मिशन हॉस्पिटलच्या संपर्कात आहेत. किडनी प्रत्यारोपणासाठी मिशन हॉस्पिटल येथे त्यांचे नेहमी येणे जाणे असते. नेहमी ते या रुग्णालयाच्या आवारात दिसू लागल्याने किडनी दलालांची नजर त्यांच्यावर गेली. नंद गोपाल आणि व्यंकटेश्वर राव यांनी उपरकर यांना हेरले आणि आपल्या स्टाईलने त्यांनी उपरकर यांना जाळ्यात ओढले. आपण वैद्यकीय व्यवसायात असल्याचे सांगत  उपरकर यांची ओळख वाढवली. या क्षेत्रातील मोठमोठ्या डॉक्टरांची आपली ओळख असून त्यांच्याशी सतत संपर्कात असल्याची बतावणीही त्यांनी उपरकर यांच्याजवळ केली. किडनी प्रत्यारोपणाची प्रक्रिया सुरु करण्याच्या नावाखाली नंद गोपाल याने उपरकर यांच्याकडून पाच लाख रुपयांची रक्कम घेतली आणि त्यानंतर व्यंकटेश राव याला त्याने पुढे केले. 

व्यंकटेश राव यानेही पुन्हा पैसे उकळण्याचा डाव टाकला आणि उपरकर यांना दुसऱ्या एका ठिकाणी नेले. किडनी प्रत्यारोपण करण्यापूर्वी काही तपासण्या कराव्या लागतात असे सांगत वेळोवेळी त्याच्याकडून रक्कम वसूल केली. एकूण पाच लाख रुपये तपासणी करण्याच्या नावावर त्याने उकळले. प्रत्यक्षात मात्र किडनी प्रत्यारोपण प्रक्रिया झालीच नाही. किडनीच्या नावाखाली या दोघांनी आपणास फसविले असल्याचे माजी आमदार उपरकर यांच्या लक्षात आले. उपरकर यांनी त्यांच्याकडे पैसे परत देण्याची मागणी केली. या दोघांनी किडनी प्रत्यारोपणाचे काम तर केलेच नाही पण रक्कम परत देण्याचीही तयारी दाखवली नाही. त्यानंतर मात्र माजी आमदार उपरकर यांनी  मिरज पोलिसात धाव घेत दोघांच्या विरोधात फसवणूक केल्याची तक्रार दिली. मिरज पोलिसांनी नंद गोपाल आणि व्यंकटेश राव या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पैशासाठी माणूस किती अमानवी वागतो हेच या घटनेने पुन्हा एकदा समोर आले आहे.    

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !