BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१५ जाने, २०२२

एक दिवसात एकट्याने तोडला सोळा टन ऊस !


 

सांगली : पन्नास वर्षे वयाच्या ईश्वर सांगोलकर यांनी चक्क एक दिवसात सोळा टन ऊसाची तोड करून साऱ्या महाराष्ट्राचेच लक्ष आपल्याकडे वेधून नव्हे खेचून घेतले आहे. 


ऊसाची तोड करणे हे तसे प्रचंड कष्टाचे काम ! खाण्यापुरते एक दोन ऊस तोडायचा प्रयत्न केला तर दंड दुखायला लागतात, इथं तर टनावर उसाची तोड करावी लागते. साखर कारखान्याचे हंगाम सुरु झाले की बीड , मराठवाडा परिसरातून उस तोड करणाऱ्या मजुरांच्या टोळ्या पश्चिम महाराष्ट्रात येतात. दहा कोयत्याची एक टोळी असते म्हणजे एका टोळीत दहा  पुरुष आणि ९ महिला मजूर असतात. एक उस तोड मजूर हा दिवसाला साधारणपणे दोन टन ऊस तोड करीत असत. त्यामुळे एकाने एका दिवशी सोळा टन ऊसाची  तोड करणे हे केवळ आणि केवळ अशक्य कोटीतील बाब आहे. त्यात वयाने पन्नाशी गाठलेल्या व्यक्तीला तर हे कठीणच आहे. असे आपण मानत असलो तरी सांगलीत समोर आलेली घटना जितकी धक्कादायक तितकीच डोळे विस्फारणारी ठरली आहे. 


सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील खैराव या गावाचे, अत्यंत सामान्य आणि गरीब कुटुंबातील ईश्वर सांगोलकर हे गेली २५ वर्षे उस तोडीचे काम करीत आहेत. वारणा सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरु असून या कारखान्यासह इतरत्रही ते गेल्या पंचवीस वर्षापासून उसाची तोड करण्याचे काम सांगोलकर करतात. गेली पंधरा दिवसांपासून कुंडलवाडी येथे उस तोड करण्याचे काम सुरु आहे. कुंडलवाडी येथील सागर सावंत यांच्या शेतात उसतोड सुरु असताना ईश्वर सांगोलकर या पन्नास वर्षे वयाच्या व्यक्तीने चक्क एका दिवसात सोळा टन उसाची तोड केली. हा या क्षेत्रातील एक मोठा विक्रम मानला जात आहे. उजनी धरणातून तून सोडणार पाणी !  


वारणा सहकारी साखर कारखान्याच्या चालू असलेल्या गळीत हंगामात कुंडलवाडी येथे संजय फाटक यांनी उस पुरवठा करण्यासाठी ट्रॅक्टरचा  करार केला आहे. या ट्रॅक्टरवर जत तालुक्यातील खैराव येथील ऊसतोड मजुराची टोळी आली आहे. याच टोळीत ईश्वर सांगोलकर या पन्नास वर्षे वयाच्या मजुराचा समावेश आहे. या सांगोलकर यांनी सावंत यांच्या शेतातील २० गुंठ्यांतील १६ टन ऊस एका दिवसात तोडला आणि या विक्रम केला. तोडलेला हा ऊस ट्रॅक्टरमधून वारणा साखर कारखान्याकडे पाठविण्यात आला पण त्याची पावती पाहून अनेकांनी विस्फारलेले डोळे बंदच केले नाहीत. कारण हे कुणालाही शक्य नसलेले आणि केवळ अशक्य कोटीतील असलेले हे काम एकट्या मजुराने केले होते. 


ईश्वर सांगोलकर यांनी केलेला हा पराक्रम पाहून अनेकांना विश्वासही बसेना. अविश्वसनीय असेच कुणालाही वाटणारे अजस्त्र काम या ईश्वरने करून दाखवले आहे. वारणा सहकारी साखर कारखान्याने ईश्वर सांगोलकर यांचा सत्कार तर केलाच आहे पण सांगली जिल्ह्यातील प्रत्येक उसाच्या फडावर केवळ त्यांचेच नाव आणि त्यांच्याच नावाची चर्चा सुरु आहे. महाराष्ट्रातील सर्व साखर कारखान्यात या ईश्वरची चर्चा सुरु झाली असून इच्छाशक्ती असली की वयाच्या पन्नाशीतही माणूस काय करून दाखवतो हेच या ईश्वरने दाखवून दिले आहे.      

   


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !