BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१९ डिसें, २०२१

पंढरपूर - करकंब मार्गावर पुन्हा अपघात : दोन ठार, पाच जखमी !



पंढरपूर : पंढरपूर -  करकंब रस्त्यावर विठ्ठल सहकारी साखर कारखान्याजवळ आज पुन्हा एक अपघात झाला असून यात दोन ठार तर पाच जण जखमी झाले आहेत. 

पंढरपूर - सांगोला रस्ता हा मृत्यूचा महामार्ग बनलेला असताना आता पंढरपूर - करकंब रस्ताही अपघाताबाबत चर्चिला जाऊ लागला आहे. उस वाहतूक करणाऱ्या  ट्रॅक्टरमुळे आत्तापर्यंत या मार्गावर अनेक अपघात झाले असून काही निरपराध लोकांचे बळी गेले आहेत. ही मालिका अजूनही संपत नसून सगळेच वाहनचालक या रस्त्यावरून वेगाने वाहने चालवत असल्याचे दिसून येत असून या वेगानेच अपघात होत आहेत. करकंब ते पंढरपूर या दरम्यानच्या मार्गावरच अधिक अपघात होत असून रस्ता रुंद आणि सिमेंट काँक्रीटचा केल्याचे वाहनाच्या वेगावर कसलेच नियंत्रण राहिलेले नाही. हा वेग अनेकांच्या जीवावर बेतत आहे. आजही उस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या वेगाचा अंदाज न आल्याने कारखाना परिसरात भीषण  अपघात झाला आणि यात दोघांचे जीव गेले आहेत. 

प्राप्त झालेल्या माहितीनुसार ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर रस्त्यावर जात असताना चढावरून त्याचा वेग मंदावला होता, याचवेळी पाठीमागून वेगाने येणारी मारुती ओमिनी थेट या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवर धडकली आणि ओमिनी गाडीतील संजीवनी आव्हाड या एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. अन्य सहा जण जखमी झाले असून त्यांना तातडीने पंढरपूर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. उपचार सुरु असताना आणखी एकाचा मृत्यू झाला तर पाच जखमी उपचार घेत आहेत.   अपघातातील मयत आणि जखमी हे नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथील आहेत. उपचार सुरु असताना सुरज भीमराव ठोंबरे या २० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. 

सदर अपघातात सौरभ घोडके (वय २०), मारुती आव्हाड ( वय ४०), वेदांत आव्हाड (वय ९), किशोर लोखंडे (वय २५), रेश्मा लोखंडे (वय २१) हे पाच जन जखमी झाले आहेत. त्यांच्यावर पंढरपूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सदर घटनेची नोंद पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसात या आणि अन्य मार्गावर अनेक अपघात झाले असून यातील बऱ्याचशा अपघातात ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टरच आहेत. ट्रॅक्टरना वाहतुकीचे नियम नसतात की काय ? असा प्रश्न पडावा इतपत त्यांची वाहतूक सुरु असते आणि त्यांना कोणीही रोखत नाही हे विशेष आहे. 


मोठ्या आवाजात गाणी लावून आणि इतर कुणाची पर्वा ना करता ट्रॅक्टर धावत सुटलेले असतात. बहुतेक ट्रॅक्टर कसलेही नियम पाळत नाहीत आणि आपल्याला कुणी रोखत नाही, कुणी तपासणी करीत नाही याची त्यांना पुरेपूर कल्पना असते. यामुळे अत्यंत बेफिकीरपणे ट्रॅक्टर चालवताना ते दिसत असतात. कधीतरी या ट्रॅक्टर चालकांना नियम शिकवले जातील का ? हा प्रश्न सर्वसामान्य माणसाला सतत पडलेला असतो.      

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !