BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१९ डिसें, २०२१

सरकोलीच्या पट्ठ्याने घातला बापाच्याच डोक्यात दगड !

 



पंढरपूर : मी कुठेही जाईन, मला विचारणारा तू कोण ? असा प्रश्न स्वतःच्याच बापाला विचारात पट्ठ्याने थेट बापाच्याच डोक्यात दगड घातल्याची घटना पंढरपूर तालुक्यातील सरकोली येथे घडली आहे.


 नात्यातले संस्कार, संस्कृती नष्ट होत असताना वडिलधाऱ्या व्यक्तींचा मान ठेवणेही अलीकडे कमी झालेले आहे. मुलाचे भविष्य चांगले घडावे म्हणून आईवडील आपल्या मुलाला शिस्त लावण्याचा प्रयत्न करतात पण काही बिघडेल प्रवृत्ती या आईवडिलांचा जीव घ्यायलाही मागेपुढे पाहत नाहीत. मुलानेच आपल्या आईचा अथवा वडिलांचा खून केल्याच्या अनेक घटना आपल्या आजूबाजूला सतत घडत असतात. जन्म देऊन स्वतः अर्धपोटी राहून पालपोषण केलेला आणि लाडाने वाढवलेला मुलगाच जेंव्हा  आईवडिलांच्या जीवावर उठतो तेंव्हा नात्यातले पावित्र्य आपोआप गुदमरू मारून जाताना दिसते. मुलांच्या काळजीपोटीच वडील मुलाची चौकशी करतात पण ते देखील मुलांना सहन होत नाही. अशीच एक घटना पंढरपूर तालुक्यातील सरकोली येथे घडली आहे. 


सरकोली येथील नंदकुमार जालिंदर भोसले (वय ४७) हे देखील आपल्या मुलाच्या भवितव्याबाबत चिंतीत असतात. मुलगा काहीच कामधंदा करीत नाही त्यामुळे वडिलांना त्याची काळजी वाटते. नंदकुमार हे सरकोली येथे शेती करून आपल्या कुटुंबाची उपजीविका सांभाळतात पण मुलगा दादासाहेब हा मोठा होऊन देखील काहीच कामधंदा करीत नाही, शिवाय घरात सतत भांडण करीत असतो. यामुळे नंदकुमार भोसले आणि त्यांच्या पत्नी काळजीत असतात. त्यातच मुलगा दादासाहेब हा संपूर्ण रात्र घरात नसल्याचे काळजी अधिक वाढली होती. पहाटे पाच वाजता घरी आलेल्या मुलाला त्यांनी हटकले. रात्रभर कुठे होतास ? अशी चौकशी नंदकुमार यांनी  आपल्या मुलाकडे केली. या चौकशीमुळे मुलगा दादासाहेब चिडला आणि आपल्याच पित्याला शिवीगाळ सुरु केली. काही समजावून सांगूनही उपयोग होत नव्हता आणि ऐकून घेण्याची त्याची मनस्थितीही नव्हती. 


मुलाच्या या वागण्याचे वडील नंदकुमार भोसले हे अस्वस्थ झाले आणि  गावात निघून गेले. काही वेळेनंतर ते परत घरी आले पण मुलगा दादासाहेब याचा रागाचा पार काही कमी झालेला नव्हता. ते घरी आल्याचे पाहताच पुन्हा दादासाहेब याने उलट विचारणा सुरु केली. 'तुझा काय संबंध आहे मला विचारायचा ? मी कुठेही जाईन !' असे म्हणत त्याने आपल्या पित्याला थेट मारहाण करायला सुरुवात केली. जन्मदात्याला लाथाबुक्क्यांनी मारलेच पण जवळच पडलेला दगड उचलून थेट पित्याच्या डोक्यात घातला. दगडाच्या या प्रहाराने वडील नंदकुमार भोसले हे कळवळले. दगडाच्या मारणे ते जखमी झाले त्यामुळे त्यांना उपचारासाठी पंढरपूर येथील उप जिल्हा रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. 


मोठी बातमी वाचा :>>  पंढरपूर, सोलापूरच्या वेशीवर आला ओमीक्रॉन  !


जखमी वडील नंदकुमार जालिंदर भोसले यांच्या फिर्यादीवरून पंढरपूर तालुका पोलीसानी मुलगा दादासाहेब भोसले याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मुलाने आपल्याच वडिलांच्या डोक्यात दगड घालून जखमी केल्याची घटना परिसरात पसरली आणि सगळीकडे चर्चा सुरु झाली. अनेकांनी या घटनेची निंदा केली असून जन्माला घातलेली मुले वडिलांशी अशा प्रकारे वागल्याचा निषेधही केला जात आहे.      

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !