BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२० ऑग, २०२२

भामटा सापडला ! बनावट कृषी अधिकारी बनून करीत होता फसवणूक !

 



शोध न्यूज : तब्बल चाळीस गुन्हे दाखल असलेला आणि कृषी अधिकारी असल्याची बतावणी करून शेतकऱ्यांना भासविणारा भामटा ठकसेन अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.


बनावट पोलीस बनून रस्त्यावर अनेकांना फसविण्याच्या घटना अलीकडे वाढत आहेत. आपण पोलीस आहोत असे सांगून दिवसाढवळ्या भर रस्त्यावर लुट केली जात आहे. भामटे कुठल्या पद्धतीने फसवतील हे सांगता येत नाही पण अशा भामट्याना वठणीवर आणण्याचे काम पोलीस करीत असतात. आपण एक कृषी अधिकारी आहे असे सांगत शेतकऱ्यांची फसवणूक देखील केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे त्यामुळे शेतकरी मंडळीनी अधिक सावध होण्याची गरज आहे. सोलापूर पोलिसांनी उस्मानाबाद येथून एका ठकसेनाच्या मुसक्या आवळल्या असून या भामट्यावर तब्बल चाळीस गुन्हे दाखल आहेत. सोलापूर जिल्ह्यात देखील याने भामटेगिरी करीत एका शेतकऱ्याची फसवणूक केली आहे. 


सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथे आपण कृषी अधिकारी असून नुकसान भरपाई म्हणून शासनाकडून १२ लाख रुपये मिळवून देतो म्हणून त्याने मोहोळ तालुक्यातील शेतकऱ्याची ५४ हजाराची फसवणूक केली आहे. सोलापूर येथे राहणारे ७० वर्षे वयाचे शेतकरी गुंडू कुलकर्णी यांनी प्रकरणी पोलिसात धाव घेतली होती. कुलकर्णी यांची मोहोळ येथे शेतजमीन असून त्यातील काही भाग वहिवाटीत गेला आहे. याची नुकसान भरपाई शासनाकडून मिळवून देण्याची बतावणी करून अमित रामा झेंडे याने त्यांची फसवणूक केली. मोबाईलवरून फोन करून झेंडे याने आपण सोलापूर येथील कंबर तलाव येथे रहात असल्याचे आणि मोहोळ येथेच कृषी अधिकारी असल्याचे सांगितले. पद्धतशीरपणे कुलकर्णी यांचा विश्वास संपादन करीत शासनाकडून तुम्हाला साडे बारा लाखांची नुकसान भरपाई मिळवून देतो असे सांगितले. 


नुकसान भरपाई मिळतेय म्हटल्यावर या वृद्ध शेतकऱ्याला बरे वाटले आणि ते झेंडे याच्या गळाला लागले. स्टॅम्प ड्युटी तसे अन्य काही खर्चासाठी म्हणून त्याने कुलकर्णी यांच्याकडून ५४ हजार रुपये घेतले. त्यानंतरही ही मदत मिळविण्यासाठी आणखी काही खर्च येईल अशी बतावणी झेंडे याने केली. त्यावेळी मात्र कुलकर्णी यांनी 'आपल्याकडे आता पैसे नाहीत त्यामुळे आपणास शासकीय मदत नको आहे, दिलेले पैसे परत करावेत' असे कुलकर्णी यांनी सांगितले. त्यानंतर मात्र भामट्या आणि तोतया कृषी अधिकारी असलेल्या झेंडे याने आपला फोन बंद केला. एकूण प्रकारावरून शंका आल्याने कुलकर्णी यांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. 


पोलिसांनी या भामट्याचा शोध घेत अखेर उस्मानाबाद येथून अमित रामा शिंदे याला अटक केली असून त्याच्यावर फसवणुकीचे तब्बल ४० गुन्हे दाखल असल्याची बाब समोर आली. (
Fake Agriculture Officer, Arrested by Solapur Police) यातील आठ गुन्हे सोलापूरच्या विविध पोलीस ठाण्यात दाखल आहेत. फसवणुकीसह अत्याचाराचा देखील एक गुन्हा उस्मानाबाद येथे दाखल आहे. या ४२० अमित झेंडे याने अनेकांना टोपी घातली असून आता त्याच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत. 


पळून गेलेला आरोपी 
अमित झेंडे याला यापूर्वीही पोलिसांनी पकडले होते परंतु पोलिसांच्या ताब्यात असताना त्याने पोलिसाना हुलकावणी देत पळ काढला होता. तो पळाल्यामुळे दोन पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. आता पोलिसांनी पुन्हा त्याला बेड्या ठोकल्या आहेत.     


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !