BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१५ डिसें, २०२१

सोलापूर पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात आत्मदहनाचा प्रयत्न !



सोलापूर : पोलिसांकडून न्याय मिळत नाही म्हणून बार्शी येथील एका युवकाने सोलापूर पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात अंगावर डीझेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. 


समाजात अन्याय होत असल्याची भावना झाली की सामान्य माणूस पोलीस ठाण्यात जातो पण अनेकदा पोलीस दखल घेत नाहीत असा अनुभव येतो. पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी सोलापूर जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून कार्यभार सांभाळल्यापासून जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा व्यवस्थित कार्यरत असल्याचे दिसते परंतु तरीही आजची घटना घडली आहे. न्याय मागण्यासाठी आत्मदहन करण्याची वेळ कुणावर येत असेल तर पोलिसांच्या दृष्टीने ही अत्यंत वाईट आणि अपमानकारक बाब आहे. 'सद्रक्षणाय, खलनिग्रहणाय' असे ब्रीद घेऊन काम करणाऱ्या पोलिसाच्या कामाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आजची ही घटना आहे. 


बार्शी येथील अमोल पुरवले या तरुणाने आज निर्धारपूर्वक आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. पोलीस आपल्या तक्रारीची दखल घेत नाही म्हणून हे पाउल उचलावे लागत असल्याचे पुरवले यांनी यावेळी सांगितले आहे. बार्शी येथील एका सहकारी बँकेच्या संचालकांनी अमोल पुरवले यांच्या नावावर बनावट कागदपत्रे तयार करून पंचवीस लाखाचे कर्ज परस्पर काढले आणि याची माहिती मिळाली तेंव्हा पुरवले यांनी पोलिसात तशी तक्रार केली. बार्शी येथील पोलिसांनी या तक्रारीची दखल घेतली नाही  तेंव्हा पुरवले यांनी पोलीस अधीक्षक कार्यालय गाठले. सदर प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत अशी विनंती त्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयास केली परंतु कोणतीच कार्यवाही झाली नाही असा अमोल पुरवले यांचा आरोप आहे. 


आपल्या तक्रारीची दखल घेतली जात नाही हे पाहून पुरवले यांनी आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता आणि त्याप्रमाणे त्यांनी आज पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात येऊन अंगावर डीझेल ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी परिसरातील पोलिसांनी त्याला पकडले आणि आत्मदहन करून दिले नाही. आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्यामुळे पोलिसांनी अमोल पुरवले या तरुणास ताब्यात घेतले आहे . नेहमी गजबजलेल्या या परिसरात अचानक हा प्रकार घडल्याने एकच गोंधळ उडाला. परिसरात काही नागरिकही होते, त्यांनी हा प्रकार पहिला पण नेमके काय घडतेय हेच सुरुवातीला कुणाच्या लक्षात आले नाही. जवळच्या पोलिसाने मात्र तातडीने धाव घेत सदर तरुणाला हे कृत्य करण्यापासून रोखले अन्यथा अनर्थ घडण्याची शक्यता होती. 


बार्शी येथील तरुण अमोल पुरवले यांनी केलेले आरोप सत्य असतील तर हा प्रकार अत्यंत गंभीर आहे. बँकेच्या संचालकांनी त्याच्या नावावर २५ लाखाचे कर्ज परस्पर काढले आहे आणि त्यासाठी बनावट कागदपत्रे तयार करण्यात आली आहेत असे पुरवले यांचे म्हणणे आहे. आजच्या घटनेने पोलीस आता या एकूण प्रकारची चौकशी करतील पण जर यात सत्य आढळले तर मात्र सदर बँक गोत्यात येणार असून आणखीही काही प्रकरणे उघडकीस येण्याची शक्यता आहे. एवढ्या गंभीर प्रकरणी पोलिसांनी दखल न घेण्याचेही काही कारण असू शकते. पुरवले यांच्या म्हणण्यानुसार चौकशी झाल्यानंतरच सत्य बाहेर येईल. पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयाच्या परिसरात हा प्रकार घडल्याने मात्र खळबळ उडाली आहे.   

 

हे देखील वाचा >>>>


भाजप नेता दोन कोटींचा मालक 'मजूर' !


सोलापूर प्रशासनाने दणका देताच पळू लागले रांगा लावायला !


पहिल्यांदाच ...! सख्खे भाऊ आणि चौघेही आमदार !


तुंगत अपघात : रक्ताचा सडा, किंकाळ्या आणि आकांत !

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !