BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२१ मे, २०२३

पंढरपूर - मल्हारपेठ रस्त्यावर अपघात झाला आणि एस टी गेली फरफटत !



शोध न्यूज : राज्य परिवहन महामंडळाची एस टी आणि माढ्याची व्हॅगनार यांच्यात समोरासमोर धडक तर झालीच पण एस टी चे स्टेअरिंग अडकल्याने एस टी पुढे तशीच फरफटत गेल्याची घटना आज पंढरपूर - मल्हार पेठ मार्गावर घडली आहे.


सुरक्षित प्रवास म्हणून राज्य परिवहन महामंडळाच्या बस सेवेचा ढोल नेहमी वाजवला जातो पण हा ढोल आता फुटलेला आहे. जुन्या आणि मोडकळीस आलेल्या बस, प्रवाशांना घेवून रस्त्यावर धावतात  आणि प्रवाशांचा जीव धोक्यात येतो. अशा अनेक घटना आजवर घडल्या आहेत. ब्रेक फेल होण्यापासून अनेक दुर्घटना एस टी संदर्भात होत असून प्रवाशांचे जीव टांगणीला लागलेले असतात. आज पुन्हा पंढरपूर - मल्हार पेठ रस्त्यावर सांगोला तालुक्यातील चिक महूद ते शेरेवाडी दरम्यान एक मोठी घटना घडली आहे. एस टी आणि व्हॅगनार यांच्यात समोरासमोर धडक झाली आणि पुन्हा एकदा या रस्त्यावर अपघात झाला आहे. तीन चार वर्षांपूर्वी हा राज्य महामार्ग नव्याने तयार करण्यात आला आणि अपघातांची मालिकाच या रस्त्यावर सुरु झाली आहे. त्यामुळे हा रस्ता देखील आता धोक्याचा असल्याचे शिक्कामोर्तब होऊ लागले आहे. 


समोरासमोर धडक होऊन झालेल्या या अपघातात दोघे जण जखमी झाले असून यातील एकाची प्रकृती गंभीर असल्याचे समोर आले आहे. एस टी आणि व्हॅगनार या दोन्ही गाड्यांचे मोठे नुकसानही झाले आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या पाटण आगाराची पाटण-सोलापूर (एम.एच.१४, बी.टी.४१०५) ही बस आणि सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील  निमगाव येथील (एम.एच.४५, ए.एल.८०२२) या क्रमांकाची व्हॅगनार यांची समोरासमोर जोरदार धडक झाली. माढा तालुक्यातून आटपाडी येथे एका लग्न सोहळ्यासाठी व्हॅगनार निघालेली होती. या गाडीतील चालक  सोमनाथ गेनदेव शिंदे (वय ३५) आणि ४५ वर्षे वयाचे केदारी भागवत पाटील हे दोघे जखमी झाले आहेत. यातील चालक शिंदे यांची प्रकृती गंभीर असून या दोघानाही पंढरपूर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.


सदर अपघात घडला त्यानंतर एस टी बस चे स्टेअरिंग अडकले आणि त्यामुळे बस तशीच पुढे फरफटत गेली त्यामुळे अधिक धोका निर्माण झाला होता परंतु सुदैवाने बस मधील प्रवाशांना या अपघातात काही झाले नाही. (ST-Wagner accident on Pandharpur - Malharpeth road)या अपघाताने मात्र पुन्हा एकदा या रस्त्यावरील अपघात हा चर्चेचा विषय बनला असून, चिकमहूद ते शेरेवाडी हा रस्ता ब्लॅक स्पाॅट बनला असल्याचे दिसत आहे. या रस्त्यावर वळणे अधिक असल्याने अपघातांचे प्रमाण अधिक आहे, त्यामुळे यावर उपाय योजण्यात यावा अशी मागणी नेहमीच होत असते. 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !