BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१५ डिसें, २०२१

तुंगत अपघात : रक्ताचा सडा, किंकाळ्या आणि आकांताने गलबलले गावकरी !

 


पंढरपूर : तालुक्यातील तुंगतजवळ काल झालेल्या विचित्र अपघातात दहा ते पंधरा जण जखमी झाले असून रस्त्यावरील रक्ताचा सडा, प्रवाशांच्या किंकाळ्या आणि आकांत यामुळे घटनास्थळावरील वातावरण गलबलून गेले होते. 


मोक्षदा एकादशी असल्यामुळे भाविकाची पंढरीतील वर्दळ वाढली आहे आणि रस्त्यावरही पायी येणाऱ्या आणि जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे. अशा परिस्थितीत तुंगत गावाजवळ चार वाहनाचा मिळून एक भीषण अपघात झाला. रस्त्याची कामे सगळीकडेच सुरु आहेत आणि यामुळे आधीही अनेक अपघात होऊन कित्येकांचे प्राण गेले आहेत. पंढरपूर - मोहोळ रस्त्याचेही काम सुरु आहे आणि यामुळे अपघाताचा धोका सतत असतो. रस्त्याच्या अशाच कामामुळे तुंगतजवळ वाहनांना एका मार्गानेच जावे लागते. यावेळी जीप, रिक्षा, मारुती आणि दुचाकी अशा चार वाहनांचा विचित्र अपघात झाला. 


सदर अपघातात दहा ते पंधरा प्रवासी जखमी झाले असून यातील चार ते पाच जणांची प्रकृती गंभीर आहे. पंढरपूर येथून काही भाविकांना घेऊन एक टमटम रिक्षा आणि क्रुझर मोहोळच्या दिशेने निघाले होते. या दोन वाहनांच्या मध्ये तुंगत येथील नारायण कांबळे हे दुचाकीवर होते. याच वेळी समोरून मारुती ओमिनी गाडी आली. तुळजापूर येथे दर्शन करून ही ओमिनी माळशिरस तालुक्यातील खुडूस गावी निघाली होती. या गाडीत ९ प्रवासी होते. अरुंद रस्त्यावरील वळणावर रिक्षा आणि दुचाकीला ओव्हरटेक करीत एक जीप पुढे जाण्याचा प्रयत्न करीत होती. या दरम्यान समोरून वेगात येणाऱ्या ओमिनी गाडीने रिक्षाला जोराची धडक दिली. यावेळी दुचाकीलाही धडक बसली. या अपघातात रिक्षा आणि ओमिनी गाडीतील १४ आणि दुचाकीस्वार असे पंधरा जण जखमी झाले. 


अरुंद रस्त्यावरील वळणावर झालेल्या या अपघाताने प्रवासी रस्त्यावर फेकले गेले होते तर रस्त्यावर रक्ताचा सडा पडला होता. अपघात होताच तुंगत येथील अनेक गावकरी मदतीसाठी धावले. जखमींचा आकांत आणि किंकाळ्या यामुळे घटनास्थळाचे वातावरण गलबलून गेले होते. प्रत्येकाचे मन हेलावून जात होते. अपघाताची माहिती मिळताच अनेकजण या ठिकाणी आल्याने गर्दीही मोठी झाली होती. जखमींना तातडीने उपचारासाठी हलविण्यात आले. काही जखमींना सोलापूर तर काहीना पंढरपूर येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 


अपघात अत्यंत विचित्र प्रकारे झालेला होता आणि जखमींची अवस्थाही अत्यंत वाईट होती. यातील तीन जखमी गंभीर असल्याने ते अपघातात ठार झाले असावेत असे अनेकांना वाटले आणि तशीच माहिती बाहेर पसरली. चार वाहनांच्या अपघातामुळे घटनास्थळी मोठा गोंधळ उडाला होता आणि त्यामुळे नक्की काय झाले आहे हे तातडीने समजू शकत नव्हते. जखमींची मोठी संख्या आणि त्यांची अवस्था  पाहता सर्वप्रथम त्यांना रुग्णालयात पोहोचवणे आवश्यक बनले होते.        

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !