BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१५ डिसें, २०२१

पहिल्यांदाच ! सख्खे भाऊ आणि चौघेही आमदार !



बेळगाव : राजकारणात घराणेशाहीचा विषय नेहमीच चर्चेत असतो पण एकाच कुटुंबातील चार सख्खे भाऊ एकाचवेळी आमदार होण्याची देशातील पहिली घटना घडली आहे आणि याची चर्चाही होऊ लागली आहे. 


राजकारण आणि घराणेशाही हा राजकारणातील नेहमीचा कळीचा मुद्दा आहे. आमदाराच्या घरातच पुढच्या पिढीला आमदारकी मिळते. सामान्य कार्यकर्ते आयुष्यभर सतरंजी उचलण्यासाठी आणि घसा फाटेपर्यंत जयजयकार करणाऱ्या घोषणा देण्यासाठीच असतात, फार फार तर एखादे किरकोळ पद देवून बोळवण केली जाते. आमदार, खासदार यांच्या घरात जन्माला येणाऱ्या पुढच्या अनेक पिढ्या हे जन्मतःच समाजसेवेचा वसा घेऊन आलेले असतात असा समज करून घेतलेला असतो. राजकारणातील घराणेशाही हा अविरत चालणारा विषय असला तरी एकाच वेळी एकाच कुटुंबातील चार सख्खे भाऊ आमदार होण्याची घटना मात्र पहिल्यांदाच समोर आली आहे.

 

बेळगाव जिल्ह्यातील जारकीहोळी कुटुंबातील चार भाऊ आमदार बनले आहेत. आधी तीन भाऊ आमदार होते आणि आता विधानपरिषद निवणुकीत आणखी एका भावाने विजय संपादन केल्याने आता चारही सख्खे भाऊ आमदार बनले आहेत. जारकीहोळी कुटुंबातील सर्वात मोठे असणारे रमेश हे गोकाक विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत, भालचंद्र हे आरभावी विधानसभा मतदारसंघातून तर सतीश हे यमकनमर्डी मतदार संघातील आमदार आहेत. आता त्यांचेच बंधू लखन हे विधान परिषदेवर निवडून घेले आहेत त्यामुळे आता एकाच घरातील चार सख्खे भाऊ आमदार बनले आहेत आणि देशातील ही पहिली घटना समजली जात आहे. रमेश आणि भालचंद्र जारकीहोळी हे दोघे भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत तर त्यांचे भाऊ सतीश जारकीहोळी हे काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत. आता विधानपरिषदेवर निवडून गेलेले लखन जारकीहोळी हे मात्र अपक्ष आमदार आहेत.  

 

काँग्रेस पक्षाचे सरकार राज्यात असताना सतीश जारकीहोळी हे मंत्री होते तर भाजपचे सरकार असताना भालचंद्र जारकीहोळी हे देखील सरकारमध्ये मंत्री होते. रमेश जारकीहोळी यांनी देखील मंत्रीपद भूषविले आहे. आता रमेश जारकीहोळी यांनीच आपले भाऊ लखन यांना विधान परिषदेची निवडणूक अपक्ष लढविण्यास सांगितली आणि त्यांनीच निवडूनही आणले आहे. जारकीहोळी बंधूंची राजकारणात वेगवेगळ्या कारणांनी नेहमीच चर्चा होत असते. वेगवेगळ्या पक्षात राहून या बंधूनी परस्परांच्या विरोधातही निवडणूक लढविली आहे. लखन यांनी २०१९ मध्ये गोकाक मतदारसंघातून पोटनिवडणूक लढवली होती. आपले बंधू रमेश यांच्या विरोधात काँग्रेस पक्षाची उमेदवारी घेऊन त्यांनी ही निवडणूक लढवली पण भाजपकडून लढणारे त्यांचे भाऊ रमेश यांचा या निवडणुकीत विजय झाला होता. पुढे दीड वर्षानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत हे दोन्ही भाऊ एकत्र आले होते आणि त्यांनी आपले बंधू सतीश जारकीहोळी यांच्या विरोधात राजकीय भूमिका घेतली होती. या बंधूनी वेगवेगळ्या राजकीय पक्षातून प्रवास केला असून आता एका वेळी चारही बंधू आमदार आहेत. 


एकाचवेळी एकाच कुटुंबातील आणि चारही सख्खे भाऊ आमदार असण्याची तशी ही दुर्मिळ घटना आहे. राजकारणात सतत चर्चेत राहिलेला जारकीहोळी परिवार आता चौथ्या आमदारामुळे पुन्हा चर्चेला आला आहे.  


हे देखील वाचा > तुंगत अपघात : रक्ताचा सडा, किंकाळ्या आणि आकांत ! 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !