BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

४ जून, २०२२

कोरोना वाढू लागलाय, निर्बंधही लागणार !


मुंबई : राज्यात पुन्हा कोरोना रुग्ण वाढत असताना काही शहरात वाढीचा वेग अधिक असून सात दिवस अंदाज घेऊन त्या ठिकाणी काही प्रमाणात निर्बंध लागू करण्यात येतील असे टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. संजय ओक यांनीच सांगितले आहे.


कोरोनाची चौथी लाट जून महिन्यात येऊ शकते असा अंदाज आधीपासूनच काही अभ्यासक व्यक्त करीत होते आणि तशी परिस्थिती हळूहळू निर्माण होताना देखील दिसू लागली आहे. मे महिन्यापासूनच राज्याच्या विविध भागात पुन्हा किरकोळ प्रमाणात कोरोना रुग्ण आढळून येऊ लागले आहेत आणि राज्याच्या काही मोठ्या शहरात ही वाढ अधिक दिसू लागली आहे.  मुंबई, ठाणे, पुणे अशा काही शहरात कोरोनाचे रुग्ण वेगळे वाढू लागले असून गेल्या दीड महिन्यात सात पटीने रुग्णवाढ झाली आहे. 


वाढत्या कोरोनाची ही परिस्थिती पाहून राज्य सरकार आणि प्रशासन पुन्हा एकदा अलर्ट झाले असून नुकतीच  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टास्क फोर्सची एक महत्वाची बैठक घेऊन वाढत्या कोरोनाबाबत चर्चा केली आणि काही सूचनाही करण्यात आल्या आहेत. नागरिकांना देखील आवाहन करण्यात आले असून पुन्हा निर्बंध नको असले तर मास्क वापरा आणि लसीकरण करून घ्या असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले आहे. आगामी पंधरा दिवस कोरोनाच्या दृष्टीने अधिक महत्वाचे असल्याचेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वीच सांगितले आहे.


राज्याच्या विविध भागात कोरोना रुग्णांची नव्याने वाढ होताना दिसत असली तरी मुंबई, ठाणे, नवी मुंबई, मीरा भाईंदर, वसई - विरार, पनवेल, पुणे, रायगड या शहरातून कोरोना वेगाने वाढू लागला आहे. कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरण हा प्रभावी उपाय असल्याचे दिसून आले आहे, तरी देखील राज्यातील १ कोटी ९ लाख नागरिकांनी अद्याप कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस देखील घेतलेला नाही. पावणे तीन कोटी नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस घेतला नाही. (Corona restrictions will apply again)  यात १२ ते १८ वयोगटातील तरुणांचा सर्वाधिक समावेश आहे. त्यामुळे या शहरातील नागरिकांना सात दिवसांची मुदत देण्यात आली असून कोरोनाला अटकाव करण्यासाठी या शहरात कडक निर्बंध लागू केले जाणार आहेत. 


राज्यातील काही शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, येथील रुग्णवाढीवर शासन आणि प्रशासन लक्ष ठेवून आहे. पुढचे सात दिवस अंदाज घेऊन सदर ठिकाणी काही प्रमाणात निर्बंध लागू केले जाणार आहेत. त्याआधी प्रत्येकाने मास्काचा वापर करावा आणि लस घ्यावी असे आवाहन टास्क फोर्स अध्यक्ष डॉ. संजय ओक यांनी केले आहे.  


लसीकडे पाठ ! 
राज्यातील सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, औरंगाबाद, अमरावती, अहमदनगर, जालना, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा, धुळे, परभणी, नंदुरबार, बीड, नांदेड, हिंगोली, अकोला या जिल्ह्यात अजूनही ३० ते ४८ टक्के नागरिकांनी कोरोना प्रतीबंधात्मंक लसीचा दुसरा डोस घेतला नाही. 


या निर्बंधाची शक्यता 
कोरोनाच्या एकूण परिस्थितीचा अंदाज घेता गर्दीच्या ठिकाणी मास्कची सक्ती, गर्दीच्या कार्यक्रमावर निर्बंध, दुसऱ्या जिल्ह्यात प्रवास करायचा असल्यास दोन्ही डोस तसेच बुस्टर डोस असणे बंधनकारक केले जाण्याची देखील शक्यता आहे. त्यामुळे हळूहळू निर्बंधाचे फास पुन्हा आवळण्याचे संकेत मिळू लागले आहेत. 


हे जरूर वाचा : >>

(खालील बातमीला टच करा )



अधिक बातम्यासाठी येथे क्लिक करा !    


 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !