BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१८ मे, २०२२

अखेर सोलापूर जिल्हा झाला कोरोनामुक्त !

 



सोलापूर : प्रचंड नुकसान करून गेलेला कोरोना अखेर सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून हद्दपार झाला असून जिल्ह्यातील सर्वच तालुके आता कोरोनातून मुक्त झाले आहेत.


कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाल्यापासून सोलापूर जिल्हा राज्यात सतत आघाडीवर राहिला परंतु कोरोनाची तिसरी लाट ओसरत निघाल्यापासून सोलापूर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत गेली आहे. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेने सोलापूर जिल्ह्याचे मोठे नुकसान केले आहे, विशेषत: पंढरपूर तालुका या कोरोनाच्या संकटात अधिक गुदमरला आणि सर्वाधिक नुकसान पंढरपूर तालुक्यातील झाले आहे. सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर तालुक्यात सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळले आणि कोरोनामुळे मृत्यू झालेल्याची संख्या देखील सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर तालुक्यातच सर्वाधिक राहिली. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेच्या तुलनेत तिसऱ्या लाटेचा प्रभाव कमी राहिला त्यामुळे साहजिकच काही प्रमाणात दिलासा मिळाला होता. चौथ्या लाटेची तलवार टांगती  असली तरी सद्या मात्र जिल्हा कोरोनाच्या संकटातून बाहेर पडला आहे. 


सोलापूर जिल्ह्याच्या ११ तालुक्यातून कोरोना हद्दपार झाला असून सद्या एकही सक्रीय रुग्ण नाही. कोरोनाच प्रादुर्भाव सगळीकडेच असला तरी सोलापूर जिल्हा हा कायम पहिल्या दहा जिल्ह्यात राहिला आहे. त्यात पंढरपूर, बार्शी, करमाळा, माढा आणि माळशिरस या तालुक्यांनी प्रशासनाची झोप उडवली होती.  या तालुक्यात अत्यंत वेगाने आणि मोठ्या प्रमाणात कोरोना वाढत राहिला आणि प्रयत्न करूनही आटोक्यात येताना दिसत नव्हता. आता मात्र सोलापूर जिल्ह्यातील एकही तालुक्यात एकही कोरोनाचा सक्रीय रुग्ण नसून सर्व तालुके पूर्णपणे कोरोनामुक्त झालेले आहेत. उपचार घेत असलेला एक रुग्ण देखील काल बरा झाला असून सक्रीय रुग्णांची संख्या आता शून्य झाली आहे. 


सोलापूर जिल्ह्याचा ग्रामीण भाग पूर्ण कोरोनामुक्त झाला असून सोलापूर शहरात आता केवळ एक रुग्ण सक्रीय आहे. सोलापूर शहरात यापूर्वीही सक्रीय कोरोना रुग्णाची संख्या शून्यावर गेली होती परंतु कालच्या अहवालानुसार अजूनही एक रुग्ण सक्रीय आहे. त्यामुळे सोलापूर शहर देखील कोरोनामुक्त होण्याच्या उंबरठ्यावर उभा आहे. (Corona deported from Solapur district) ग्रामीण विभागात मात्र सक्रिय रुग्णाची संख्या काल पहिल्यांदाच शून्यावर पोहोचली आहे त्यामुळे हा मोठा दिलासा मानला जात आहे. 



पाच हजारावर मृत्यू !
सोलापूर शहर आणि जिल्ह्यात एकूण २ लाख १९ हजार ७३१ नागरिक कोरोनाबाधित झाले होते आणि त्यातील ५ हजार २३१ रुग्णांना दुर्दैवाने प्राण गमवावा लागला आहे. जिल्हा ग्रामीण विभागात १ लाख ८६ हजार ६४ व्यक्ती बाधित झाल्या होत्या त्यातील ८२ हजार ३३८ रुग्ण बरे झाले आहेत. सोलापूर शहरात ३३ हजार ६६७ रुग्णांपैकी ५०५ रुग्णांचा प्राण कोरोनाने घेतला आहे. 


तलवार  टांगती आहेच !  
राज्यातील अनेक जिल्हे कोरोनामुक्त होत असल्याचा मोठा दिलासा लाभत असला तरी अद्याप धोका टळलेला नसून कोरोनाची तलवार टांगती आहेच त्यामुळे सावधगिरी बाळगण्याचे आवाहन राज्याच्या आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे. सक्ती नसली तरी देखील गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर करण्याबाबत आवाहन करण्यात येत आहे.

हे देखील वाचा : >>




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !