BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१७ मे, २०२२

उन्हाळा संपत आला तरी उजनी धरण अजूनही प्लस !



पंढरपूर : नेहमीपेक्षा कडक असणारा उन्हाळा संपत आला तरीही उजनी धरण अजूनही प्लसमध्येच असून पावसाळा तोंडावर आलेला असतानाही उजनी धरणात ६ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे. 


सोलापूर जिल्ह्यासाठी उजनी धरण वरदायिनी मानले जातेच पण पुणे, अहमदनगर जिल्ह्यांना देखील या धरणाचा लाभ मोठ्या प्रमाणात होत असतो. उजनी धरणामुळे उजाड शेतीचे नंदनवन बनले आहे तर शेतकऱ्यांच्या जीवनात एक मोठी आर्थिक क्रांती उजनी धरणाने केली आहे. उजनीच्या पाण्यासाठी राजकारण आणि संघर्ष हा कायमच सुरु आहे आणि पाणी पळवापळवीचा खेळ हा न थांबणारा आहे. उजनीच्या पाण्याचे नियोजन थोडेसे जरी चुकले तरी उन्हाळ्यात 'धरण उशाला आणि कोरड घशाला' अशी परिस्थिती निर्माण होत असते. यावेळी मात्र कडक उन्हाळा असतानाही मे महिना अर्धा संपला तरी देखील  उजनी धरणात मुबलक पाणी साठा उपलब्ध आहे. 


मागील वर्षी राज्यात सगळीकडेच समाधानकारक पाऊस झाला आणि सगळ्याच धरणांची तहान भागली. उजनी धरण हे इतर धरणांपेक्षा मोठे असून मागील वर्षी हे धरण ११० टक्के भरले आणि त्यानंतरही पाण्याचे योग्य नियोजन झाले त्यामुळे यावर्षी पाण्याची टंचाई जाणवली नाही. पाऊस चांगला झाला नाही तर मात्र धरण असतानाही लाभक्षेत्रात दुष्काळाच्या झळा आणि पिण्यासाठी आवश्यक पाण्याचीही टंचाई निर्माण होते हे यापूर्वीही अनुभवावे लागले आहे. (In Ujani Dam Plus at the end of summer) यावर्षी मात्र तशी परिस्थिती नसून अद्याप सहा टीएमसी पाणी जिवंत साठ्याच्या स्वरुपात धरणात शिल्लक आहे. त्यामुळे पावसाळा लांबणीवर पडला तरीही शेतकऱ्यांना चिंता करण्याची आवश्यकता उरणार नाही.


सत्तर टीएमसी साठा !

सहा टीएमसी जिवंत पाणीसाठा असला तरी धरणात एकूण पाणी साठा ७० टीएमसी एवढे आहे. त्यात १२ टीएमसी एवढा गाळ आहे. धरणातील गाळाची समस्या वरचेवर वाढत असून त्यामुळे पाणी साठ्याची क्षमता कमी होत आहे. धरणातील गाळ पाण्याची जागा व्यापात असल्यामुळे साठत असलेला हा गाळ देखील एक आव्हान म्हणूनच समोर येत आहे. 


एक आवर्तन शक्य 

यावर्षी जोरदार पाऊस होणार असल्याचा अंदाज सर्वच हवामान विभागाने व्यक्त केलेला असून जून महिन्यात सगळीकडे चांगला पाऊस होणार असल्याचेही हवामान विभागाने सांगितले आहे. त्यामुळे नेहमीसारखे यावर्षी पावसाला लांबण्याची शक्यता नाही परंतु तरीदेखील पावसाला लांबणीवर पडलाच तरी शेतीसाठी आणि पिण्यासाठी एक आवर्तन सोडणे शक्य आहे. 


गरज पडल्यास --

उजनी धरणात ६ टीएमसी एवढा जिवंत पाणी साठा असला तरी मायनस परिस्थिती देखील आवश्यकता पडेल त्यानुसार पाणी सोडले जाते. अपवादाच्या परिस्थितीत मायनस २८ टक्के पर्यंत यापूर्वी पाणी सोडण्यात आलेले आहे. यावर्षी मात्र अशी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता दिसत नाही.      


  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !