पंढरपूर : चैत्र एकादशीनिमित्त पंढरीला येत असलेल्या आणि यात्रा करून परत जाताना भाविकांच्या गाडीला तिसरा अपघात झाला असून तिसऱ्या अपघातात दोघांचा मृत्यू तर पंधरा भाविक (Pandharpur Vari) जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचारी संपामुळे एस टी प्रवास कठीण झाल्यामुळे पंढरीला येण्यासाठी भाविक खाजगी वाहनांचा पर्याय निवडतात आणि यातच अपघात होतात. चैत्र यात्रेसाठी अधिकाधिक भाविकांनी अशा खाजगी वाहनातून प्रवास केल्याचे दिसून आले आहे. पंढरीची चैत्री वारी नुकतीच संपन्न झाली. वारीचा हा सोहळा भाविकांसाठी एक आनंद सोहळा असतो पण यावेळी चैत्र यात्रेच्या निमित्ताने येणाऱ्या भाविकांच्या तीन वाहनांना अपघात झाला आहे. पहिल्या दोन अपघातात जखमी होण्यावर निभावले होते पण तिसऱ्या अपघातात मात्र दोन भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. (Third Accident to Pandharpur devotees)
परभणी जिल्ह्यातील २३ भाविक एका पिकअप टेंपोमधून पंढरीच्या चैत्र वारीस आले होते. पंढरीच्या पांडुरंगाचे दर्शन घेवून आणि चैत्र एकादशीचा सोहळा साजरा करून हे भाविक त्याच पिकअप वाहनातून परतीच्या प्रवासाला लागले होते. तेलगाव - माजलगाव दरम्यान नित्रुड, टालेवाडी पुलावर त्यांच्या वाहनाला मोठा अपघात झाला. दुचाकी, पिकअप आणि उसाचे ट्रॅक्टर असा तिहेरी अपघात घडला. भाविकांच्या पीकअप टेंपोच्या चालकाचे नियंत्रण सुटले आणि एकाच वेळी तीन वाहनांचा हा अपघात झाला. (Pandharpur Accident) या अपघातात पंधरा जण जखमी झाले तर दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. जखमीतील पाच जणांची प्रकृती गंभीर आहे.
पहिला अपघात
चैत्र यात्रेनिमित्त पंढरीला येणाऱ्या वाहनाचा पहिला अपघात एकादशीच्या दिवशीच पहाटे घडला. तळेगाव दाभाडे येथून पिकअप टेंपो घेऊन अनेक भाविक पंढरीला येत असताना चालकाला झोप आली. झोपेमुळे त्याचे नियंत्रण सुटले आणि पिकअप विजेच्या खांबावर जाऊन धडकला. यात जवळपास १९ भाविक जखमी झाले असून त्यांना सोलापूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. पुणे जिल्हयातून पंढरपूर जवळ पोहोचल्यावर पिराची कुरोली हद्दीत हा अपघात झाला होता.
दुसरा अपघात
चैत्र एकादशीचा सोहळा आटोपून आपल्या गावी परत निघालेल्या भाविकांच्या वाहनाला पंढरपूर तालुक्यातच पंढरपूर करकंब रस्त्यावर अजोती पाटीजवळ एक टँकरने धडक दिल्याने दुसरा अपघात झाला. औरंगाबाद जिल्ह्यातील नारायणपूर येथील वारकरी छोटा हत्ती (एम एच ४१ ए यु ३०८०) घेवून पंढरपूरच्या चैत्र वारीसाठी आलेले होते. एकादशीचा सोहळा साजरा करून हे भाविक त्याच छोटा हत्ती मधून परत आपल्या गावी निघाले होते. पंढरपूरपासून जवळच टेंभुर्णी मार्गावर अजोती पाटीजवळ व्हटे वस्तीजवळ भाविकांच्या वाहनाला भरधाव वेगातील एका टँकरने धडक दिली त्यामुळे हा अपघात झाला आहे. टँकरने जोराची धडक दिल्यानंतर छोटा हत्ती पलटी होऊन २० वारकरी जखमी झाले. या वाहनातून २५ वारकरी परतीचा प्रवास करीत असल्याचे समजते .
खाजगी वाहने धोक्याची
भाविकांच्या वाहनांना झालेले तीनही अपघात हे खाजगी वाहनांना झाले आहेत. पिकअप टेंपो आणि छोटा हत्ती अशी वाहने घेवून भाविक दूर अंतरावरून पंढरीला आलेली होती. एस टी संप असल्यामुळे अनेक भाविक मिळून खाजगी वाहन भाड्याने घेवून पंढरपूर यात्रेसाठी येत आहेत आणि अशाच वाहनांना अपघात होत आहेत. क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी अशा वाहनातून प्रवास करीत असल्याचेही दिसत आहे. असा प्रवास भाविकांच्या जीवावर बेतला जात आहे. त्यामुळे भाविकांनी याबाबत दक्षता घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
हे देखील वाचा :
- इंदुरीकर महाराजांच्या गाडीला अपघात !
- उजनी कालव्यात पंधरा वर्षाचा मुलगा बेपत्ता !
- आमच्या नादाला लागू नका ! संभाजी ब्रिगेडचा इशारा !
अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !