BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१० सप्टें, २०२३

गणेशोत्सवात जादा आवाज कराल तर -----! पोलिसांचा इशारा !!

 




शोध न्यूज : गणेशोत्सवाच्या काळात जादा आवाज करायचा नाही, अन्यथा कारवाई केली जाईल असा स्पष्ट इशाराच सोलापूर ग्रामीण पोलिसांनी दिला आहे, शिवाय जवळपास एक हजार व्यक्तींवर पोलिसांची खास नजर देखील असणार आहे. 


गणेशोत्सव हा सार्वजनिक आनंदाचा आणि उत्साहाचा सोहळा असतो पण काही जणांना हे दिवस केवळ धांगडधिंगा घालण्याचे असल्यासारखे वाटते. अकारण कर्णकर्कश आवाज केला जातो, मोठ्या आवाजात वाद्ये वाजवली जातात. अनेकदा प्रतिस्पर्धी गणेश मंडळाला 'खुन्नस' देण्याच्या भावनेतून कर्णकर्कश गाणी वाजवली जातात. पण या सगळ्याचा त्रास लहान मुलांपासून वृद्धापर्यंत अनेकांना होत असतो. अभ्यास करणाऱ्या विध्यार्थ्यांना देखील यामुळे व्यत्यय येत असतो. या आवाजामुळे हृद्यविकाराने अनेकांचा मृत्यू देखील झाला असल्याचे दिसून आले आहे. पण आता मोठ्या आवाजावर पोलिसांनी (Solapur Police) करडी नजर ठेवण्याचा निश्चय केल्याचे दिसत आहे. डीजेमुक्त गणेशोत्सव साजरा करण्यासाठी यावर्षी पोलिसांना नॉईज लेव्हल मशिन उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यामुळे वाढलेल्या आवाजाची योग्य नोंद होणार आहे, क्षमतेपेक्षा अधिक आवाज असलेल्या मंडळांवर कारवाई करण्याचा इशाराही पोलिसांनी दिला आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी पारंपारिक वाद्यांच्या गजरात गणेशोत्सव साजरा करावा. लाखोंचा खर्च करून मोठ्या आवाजाचे वाद्य लावण्यापेक्षा तोच खर्च सामाजिक उपक्रमांवर खर्च करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. 


गणेशोत्सव शांततेत साजरा होण्यासाठी पोलीस यंत्रणा दक्ष झाली असून सोलापूर जिल्ह्यातील जवळपास एक हजार व्यक्तींवर पोलिसांची खास नजर असणार आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या, ग्रामीण भागातील सातशे, तर सोलापूर शहरातील २६७ व्यक्तींवर पोलीस विशेष नजर ठेवणार आहेत.  यावेळी सोलापूर जिल्ह्यातील ४०० गावात 'एक गाव, एक गणपती' ही संकल्पना राबवली जाणार आहे. (Solapur police alert for Ganeshotsav) मागील वर्षी माळशिरस, बार्शी, करमाळा सांगोला, मंगळवेढा, अक्कलकोट, मोहोळ या तालुक्यात २६० गावात ही संकल्पना राबविण्यात आली होती, यावेळी मात्र ही संख्या वाढलेली आहे. १९ सप्टेंबर पासून गणेशोत्सवाला सुरुवात होत असून, प्रत्यक्षात किती गावात 'एक गाव एक गणपती' संकल्पना राबवली जातेय हे दिसणार आहे. गणेशोत्सव शांततेत आणि पारंपारिक पद्धतीने साजरा होण्यासाठी पोलीस प्रशासन मात्र वेगाने कामाला लागले असून तालुका आणि उपविभागीय स्तरावर बैठका घेण्याचे देखील पोलिसांनी नियोजन केले आहे.  


पोलिसांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना आवाहन केलेले असून, त्यानुसार आनंदी आणि पारंपारिक वातावरणात हा उत्सव साजरा होण्याची अपेक्षा आहे. ध्वनी प्रदूषण करणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांवर पोलीस कारवाई देखील करणार आहेत, त्यामुळे आवाजाची पातळी मर्यादेत ठेवणेच मंडळांच्या हिताचे  राहणार आहे. 




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !