BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१५ जाने, २०२४

गोळीबार प्रकरणी तिघे ताब्यात, दोन जिवंत काडतुसे जप्त !

 


शोध न्यूज : पंढरपूर तालुक्यातील दोघांवर झालेल्या गोळीबार प्रकरणी मोहोळ पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले असून दोन जिवंत काडतुसे देखील पोलिसांनी जप्त केली आहेत.


पंढरपूर - शेटफळ रस्त्यावर १३ जानेवारीच्या रात्री घडलेल्या गोळीबाराच्या घटनेने सोलापूर जिल्हा चांगलाच हादरून गेला आहे. हा प्रकार कौटुंबिक वादातून झाला असल्याची शक्यता पुढे आली आहे. पंढरपूर तालुक्यातील पटवर्धन कुरोली येथील सिद्धेश्वर ब्रह्मदेव नाईकनवरे आणि त्यांचा नातेवाईक आदित्य व्यवहारे हे आपल्या दुचाकीवरून घराकडे निघालेले असताना, पंढरपूर - शेटफळ रस्त्यावर, दुचाकीवरून आलेल्या अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर गोळीबार केला होता. शेटफळ रस्त्यावर आष्टी गावाच्या हद्दीत ही घटना घडली होती.  क्रमांक नसलेल्या एका दुचाकीवरून तिघे जान आले आणि नाईकनवरे यांची मोटार सायकल अडवली. अज्ञात तिघांपैकी एकाने, त्याच्याजवळ असलेल्या बंदुकीने गोळीबार केला पण त्यांचा प्रयत्न अयशस्वी झाला होता. २५ ते ३० वयोगटातील अज्ञात हल्लेखोर आपल्यावर हल्ला करीत असल्याचे दिसताच, नाईकनवरे आणि  व्यवहारे हे जवळच असलेल्या उसाच्या पिकात पळून गेले.


हा प्रकार सुरु असतानाच रस्त्यावरून अन्य वाहने तेथे येऊ लागल्याने, या अज्ञात तीन हल्लेखोरांनी आपली मोटार सायकल घेवून तेथून पळ काढला होता. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच आष्टी येथील अनेक गावकरी घटनास्थळी पोहोचले होते. माहिती मिळताच पोलीस देखील तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी घटना स्थळाचा पंचनामा करून पुढील कार्यवाही सुरु केली. या प्रकरणी मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तपासाची पुढील चक्रे गतीने फिरवली आहेत आणि या प्रकरणी संशयावरून तिघांना पोलिसांनी ताब्यात देखील घेतले आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून दोन जिवंत काडतुसे हस्तगत केली आहेत तसेच  सीसीटीव्ही फुटेज व अन्य काही धागेदोरे मिळतात का ते पोलिसांचे तपासण्याचे काम सुरू आहे. 


सोलापूर जिल्ह्यात अशा प्रकारच्या गंभीर घटना घडत नाहीत त्यामुळे या घटनेने जिल्हा हादरून गेला आहे. गेले दोन दिवस सोलापूर जिल्ह्यात, विशेषत: पंढरपूर आणि मोहोळ तालुक्यात मोठी चर्चा आहे. हे घटना कौटुंबिक वादातून घडली असावी असा एक मत प्रवाह समोर आला असून, मोहोळ पोलीस वेगाने तपास करीत आहेत. (Three suspects in custody in the shooting case) सदर अज्ञात हल्लेखोर पळून गेले असले तरी, ते लवकरच मोहोळ पोलिसांच्या कोठडीत दिसतील अशी शक्यता व्यक्त होत आहे. मोहोळ पोलिसांनी देखील तशाच पद्धतीने तपास सुरु केला आहे. दरम्यान संशयित म्हणून ताब्यात घेतलेल्या तिघांकडे पोलीस कसून चौकशी करीत आहेत. या घटनेतील हल्लेखोर कोण आहेत याची आता पोलिसांसह सामान्य नागरिकांनाही जिज्ञासा लागून राहिली आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !