BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१३ एप्रि, २०२२

आम्ही आग्या मोहोळ, आमच्या नादाला लागू नका ! संभाजी ब्रिगेड आक्रमक

 



मुंबई : 'संभाजी ब्रिगेड आग्या मोहोळ आहे, आमच्या नादाला लागू नका' असा सणसणीत इशारा संभाजी ब्रिगेडने (Sambhaji Brigade) दिला असून सभेत राज ठाकरे यांनी चुकीचा संदर्भ दिल्याने हा संघर्ष निर्माण होणार याचे संकेत आधीच मिळू लागले होते. 


महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यात घेतलेली उत्तर सभा पुन्हा एकदा टीकेची धनी ठरली असून या सभेची शरद पवार यांच्यापासून जितेंद्र आव्हाड यांच्यापर्यंत अनेकांनी खिल्ली उडवली आहे. संभाजी ब्रिगेडने मात्र खास आपल्या पद्धतीने इशारा दिला असून वास्तव समोर मांडले आहे. शरद पवार हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेत नाहीत, त्यांनी १९९९ ला राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर संभाजी ब्रिगेड स्थापन केली अशा प्रकारचे विधान राज ठाकरे यांनी ठाणे येथील सभेत केले होते. हे विधान चुकीचे असल्याने अपेक्षेप्रमाणे संभाजी ब्रिगेडने उत्तरासह इशारा दिला आहे आणि राज ठाकरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची देखील मागणी केली आहे. 


संभाजी ब्रिगेडची स्थापना १९९५ साली झाली आहे, त्यानंतर चार वर्षांनी राष्ट्रवादीची स्थापना झाली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना मात्र २००६ साली 'बाळुत्यात' होती. वयाने मोठा असतो तो बाप असतो हे राज ठाकरे यांनी लक्षात घ्यावे. जो व्यक्ती स्वत:च्या आजोबाचा होत नाही तो महाराष्ट्राचा काय होणार ? खोटा इतिहास सांगणाऱ्या माणसाची किती लाचारी करायची ? असा सवाल देखील संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी (Sambhaji Brigade attacks Raj Thackeray) उपस्थित केला आहे. 


यांच्या चुली कोण पेटवतो ?
महागाई एवढी वाढली असताना राज ठाकरे महागाईवर बोलायला तयार नाहीत. त्यांच्या गाडीत पेट्रोल डीझेल कोण भरते ? घरातील सिलिंडर कुणाच्या पैशाने पुरवला जातो ? त्यांच्या कार्यकर्त्यांची घरे कशी चालतात ?  राज ठाकरे यांना महाराष्ट्रात दंगली घडवायच्या आहेत काय ? असे अनेक आणि नेमके सवाल संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी उपस्थित केले आहेत. 


गुन्हा दाखल करा 
वादग्रस्त भाषण करून महाराष्ट्र पेटविण्याची भाषा केली जात असेल आणि तरीही महाविकास आघाडी सरकारचे गृहमंत्री डोळे बंद करून बसणार असतील तर हे राज्याचे दुर्दैव आहे. महाराष्ट्राचे सामाजिक वातावरण गढूळ झाले असून वादग्रस्त विधानासाठी राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी देखील करण्यात आली. 


आम्ही आग्या मोहोळ !
संभाजी ब्रिगेड प्रबोधनकार ठाकरे यांचा वैचारिक वारसा जपते आणि त्या विचाराप्रमाणे काम करते. राज ठाकरे यांना पेट्रोल डीझेल, गॅस, इंधन दरवाढ दिसत नाही , पुरंदरेची चमचेगिरी दिसते.  संभाजी ब्रिगेड हे आग्या मोहोळ आहे, आमच्या नादाला लागू नका असा इशारा ब्रिगेडने दिला आहे. 


'वंचित' चीही मागणी 
राज ठाकरे यांची भूमिका दंगली घडविणारी असून मुख्यमंत्री, गृहमंत्री यांनी तातडीने दखल घेत राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ऍड प्रकाश आंबेडकर यांनी आज अकोला येथे पत्रकार परिषदेत केली आहे. धर्माचा प्रसार, प्रचार करण्याचा अधिकार सर्वानाच आहे त्यामुळे मंदिरावर भोंगे लावून हनुमान चाळीस लावल्यास कुणालाही आक्षेप असणार नाही पण मशिदीपुढे भोंगे लावून हनुमान चाळीस लावणे ही भूमिका दंगली घडवणारी आहे असे त्यांनी म्हटले आहे. 


एक गुन्हा दाखल !

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात आर्म्स ऍक्टनुसार गुन्हा दाखल झाला असून त्यांच्यासह ठाणे जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष आणि अन्य सात ते आठ जणांच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय हत्यार कायदा १९५९ चे कलम ४ आणि २५ तसेच भारतीय दंड विधान कलम ३४ नुसार हा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 


 हे देखील वाचा : 

बातमीला टच करा >>


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !