BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१० एप्रि, २०२२

पोलिसांनी घडवली माय लेकराची भेट !







मंगळवेढा : गुन्हेगारांचा शोध घेणाऱ्या पोलिसांनी आणखी एक मानवतावादी काम केले असून भेदरलेल्या एका सात वर्षाच्या मुलाची  त्याच्या आईवडिलांची भेट घडवून देण्यात आली आहे. नागरीकातून देखील याचे कौतुक होताना दिसत आहे. 

गुन्हे रोखणे, गुन्ह्यांचा तपास करणे इथपासून ते वेगवेगळ्या बंदोबस्तासाठी अहोरात्र राबण्याचे काम पोलिसांना करावे लागते. प्रचंड परिश्रम करीत असलेल्या पोलिसांना काही मोजक्या पोलिसांमुळे अनेकदा बदनामीला देखील सामोरे जावे लागते. समाजात पोलीसंबद्धल हवी तेवढी आपुलकीची भावनाही दिसत नाही पण पोलिसात देखील माणूस असतो हे अनेकदा दिसून आले आहे. अशीच माणुसकी  दाखविणाऱ्या मंगळवेढा पोलीस  ठाण्यातील पोलीस नाईक शिवाजी पांढरे यांची चर्चा असून नागरीकातून पांढरे यांच्या माणुसकीच्या कार्याला सलाम केला जात आहे.

मंगळवेढा शहरात सात वर्षे वयाचा एक मुलगा अत्यंत घाबरलेल्या अवस्थेत फिरत असल्याची माहिती मंगळवेढा पोलीस ठाण्यात मिळाली. यावेळी पोलीस नाईक हे ठाणे अंमलदार म्हणून कर्तव्यावर होते. पोलीस आपली तक्रार घेत नाहीत अशी अनेकदा ओरड असते मग केवळ एक छोटा मुलगा घाबरलेल्या अवस्थेत फिरतो आहे म्हटल्यावर पोलीस फारसे लक्ष देतील असे कुणाला वाटणार  नाही. पण ठाणे अंमलदार असलेले शिवाजी पांढरे यांनी कर्तव्यासह मानवतेच्या भूमिकेतून याकडे पहिले. काही वेळात या छोट्याशा अवघ्या सात वर्षे वयाच्या मुलास पोलीस ठाण्यात आणण्यात आले. सात वर्षाचा हा मुलगा व्यवस्थित नाव पत्ता हे काहीच सांगत नसल्याने पोलिसांची देखील अडचण झाली. 

पोलिसांपुढे आव्हान !
पोलीस नाईक पांढरे यांनी या मुलाला विश्वासात घेतले, मायेने त्याच्या डोक्यावर हात फिरवत त्याला आपुलकीने  माहिती विचारण्याचा प्रयत्न केला पण हा मुलगा काहीच बोलत नव्हता. घाबरलेल्या नजरेने तो इकडे तिकडे पहात होता.  काहीच माहिती देत नसल्यामुळे त्याच्या पालकांचा शोध घेणे हे एक आव्हान बनले होते. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे त्याच्या घशाला कोरड पडली होती. पांढरे यांनी त्याला पाणी प्यायला दिले. आपुलकीचा विश्वास देण्याचा प्रयत्न केला पण हा मुलगा काही बोलत नव्हता. हा मुलगा कुठल्या गावचा ? रस्त्यावर उन्हातान्हात तो एकटा का फिरत होता? याचे पालक कोण? या कुठल्याच प्रश्नाचे उत्तर पोलिसांना मिळत नव्हते. काही करून त्याच्या पालकांचा  शोध घेणे पोलिसांसाठी आवश्यक बनले होते. 

-- आणि माहिती मिळाली !
पोलिसांच्या आपुलकीमुळे काही वेळाने  या मुलाला थोडासा  धीर आला होता. काही वेळ गेल्यानंतर हा मुलगा काहीसा अडखळत बोलू लागला. त्याच्या या अडखळत बोलण्यातून शिवाजी पांढरे यांनी त्याची माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला. सदर मुलगा हा पंढरपूर तालुक्यातील अनवली येथील संतोष घोडके असे असल्याची माहिती पांढरे यांनी मिळवली. अनवली येथील गावकऱ्याकडून संतोष घोडके यांचा व्हॉटस ऍप क्रमांक मिळवला. या क्रमांकावर या मुलाचा फोटो पाठवून देण्यात आला. संतोष घोडके यांनी हा आपलाच सात वर्षाचा मुलगा प्रवीण असल्याची माहिती पोलिसांना दिली.  मोठ्या प्रयत्नाने पोलिसांना मुलाच्या पालकांचा ठावठिकाणा मिळाला होता. यामुळे पोलीस आनंदित झाले होते. 

मुलाला दिले ताब्यात !
संतोष घोडके यांनी  तातडीने मंगळवेढा तालुक्यातील मेटकरवाडी येथील प्रवीणचे मामा तुकाराम पवार याना ही माहिती दिली आणि पवार हे धावत मंगळवेढा पोलीस ठाण्यात आले. त्यांनीही मुलाला ओळखले. पोलिसांनी प्रवीणला त्याच्या स्वाधीन केले.  भेदरलेल्या आणि काही माहिती सांगू शकत नसलेल्या छोट्या मुलास त्याचे नातेवाईक मिळाल्याचे समाधान पोलिसांच्या आणि पोलीस नाईक शिवाजी पांढरे यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते. पोलिसातील माणूस जागा झाला आणि छोटे मूल त्यांच्या पालकांच्या कुशीत विसावले.The humanity of the police) यासाठी नेटाने प्रयत्न करणाऱ्या पोलीस नाईक शिवाजी पांढरे यांना नागरीकातून देखील धन्यवाद दिले जात आहेत.    




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !