BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१४ मार्च, २०२२

बारावी परीक्षेचा पेपर परीक्षेआधीच व्हाट्स ऍपवर !

 



मुंबई : पेपर फुटीचे सत्र महाराष्ट्रात सुरूच असून आता बारावीच्या रसायन शास्त्र विषयाचा पेपर फुटला (Paper leaked ) असून परीक्षेच्या आधीच हा पेपर विद्यार्थ्यांना  व्हाट्स ऍपवर मिळाला असल्याचे उघडकीस आले आहे. 

शिक्षक पात्रता परीक्षा घोटाळा राज्यभर गाजला असताना आणि या घोटाळ्यात अनेक मोठे मासे गळाला लागलेले असताना परीक्षेच्या पेपर फुटण्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. पेपर फुटीचे विविध प्रकार गेल्या काही काळात घडले आणि ते उघडे देखील पडले आहेत. त्यात आता बारावीच्या परीक्षेचा एक पेपर फुटला असल्याची माहिती समोर आली आहे.  कोरोनाच्या कालावधीत विद्यार्थ्यांचे शिक्षण व्यवस्थित होऊ शकले नाही, त्यात परीक्षा ऑनलाईन घ्यायची की ऑफलाईन घ्यायची ही चर्चा सुरूच राहिली आणि बारावीची परीक्षा देखील सुरु झाली. 

दरम्यान बारावीची रसायन शास्त्र विषयाचा पेपर फुटल्याची मोठी घटना उघडकीस आली असून हा प्रकार एका खाजगी क्लासमधून झाला असल्याचे दिसून आले आहे. (Hsc Board exam) खाजगी कोचिंग क्लासमधील तीन विद्यार्थ्यांना हा पेपर आधीच मिळाला होता. परीक्षा सुरु होण्यापूर्वीच रसायन शास्त्र विषयाचा पेपर या विद्यार्थ्यांना  व्हाट्स ऍपवर मिळाला आहे. मालाड येथील खाजगी कोचिंग क्लासचे नाव यात पुढे आले असून मुकेश यादव हे शिक्षक हा क्लास चालवत आहेत. 

पेपर फुटल्याचा हा गंभीर प्रकार समोर आल्यावर पोलिसांनी यादव याना ताब्यात घेऊन चौकशी सुरु केली आहे. विले पार्ले येथील एक विद्यार्थिनी परीक्षेसाठी उशिरा आल्याने तिची चौकशी करण्यात आली त्यावेळी पेपर फुटण्याचा हा प्रकार उघडकीला आला आहे. विले पार्ले पोलिसांनी या प्रकाराची चौकशी सुरु केली असून सदर तीन विद्यार्थ्यांची देखील यात चौकशी करण्यात आली आहे. (Twelfth Chemistry Exam Paper Leak ) परीक्षेचा हा पेपर फोडण्याच्या घटनेत मुकेश यादव व्यतिरिक्त आणखी कोणाचा सहभाग आहे याचा देखील शोध पोलीस घेऊ लागले आहेत. 

शिक्षक पात्रता परीक्षेत गैरप्रकार करताना मोठ्या रकमेची उलाढाल झालेली होती, बारावीच्या पेपर फोडण्यात देखील काही आर्थिक व्यवहार आहेत का ? याची चौकशी वेगाने सुरु करण्यात आली आहे. शिवाय फुटलेला हा पेपर किती विद्यार्थ्यांपर्यंत परीक्षेआधीच पोहोचला होता याचीही माहिती पोलीस मिळवत आहेत. टीईटी, लष्कर भरती परीक्षा यांचे पेपर असेच फुटले होते आणि मोठी खळबळ उडाली होती. आता बारावीच्या परीक्षेबाबत देखील असाच प्रकार उघडकीस आला असून पोलीस सर्व अंगाने आणि बारकाईने तपासाला लागले आहेत. दरम्यान उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून अद्याप याबाबत काहीच स्पष्टीकरण समोर आलेले नाही. पेपर फुटल्याचे उघडकीस आल्याने मात्र शिक्षण वर्तुळात जोरदार खळबळ उडाली आहे.  

शिक्षणमंत्र्यांचा खुलासा 
बारावी रसायन शास्त्र विषयाचा संपूर्ण पेपर फुटला नसल्याचा खुलासा शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करून एकाला अटक करण्यात आली आहे, तथापि पूर्ण पेपर फुटला नसून प्रश्नपत्रिकेतील काही भाग विद्यार्थ्यांच्या मोबाईलमध्ये आढळून आला आहे असे वर्षा गायकवाड यांनी सांगितले आहे.  

हे देखील वाचा : >>>


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !