अहमदनगर : संगमनेर तालुक्यातील एका शेतात तब्बल सात किलो वजनाचे रताळे आढळले असून या रताळ्याची राज्यभर चर्चा सुरु झाली आहे. हे रताळे ( Seven Kilos Sweet Potato) पाहण्यासाठी देखील अनेक शेतकऱ्यांनी गर्दी केली.
नेहमीपेक्षा काही वेगळे घडले की चमत्कार आणि आश्चर्य वाटायला लागते. कृषी क्षेत्रात गेल्या कित्येक वर्षांपासून अशा परकराचे काही न काही आश्चर्य हमखास समोर येत आहेत. लातूर जिल्ह्यातील दीड फुट लांबीची चिंच अलीकडेच राज्यभर चर्चेची ठरली पण हा प्रयोग तरी करण्यात आला होता. संगमनेर तालुक्यातील सावरगाव तळ येथील हिराबाई नेहे (Hirabai Nehe) यांनी मात्र कसलाही प्रयोग अथवा आधुनिक बियाणे याचा वापर न करता त्यांच्या शेतातील एका वेलाला चक्क एकच रताळे लागले असून त्याचे वजन तब्बल सात किलो आहे. अर्थातच या परिसरात हा कुतूहलाचा (Curiosity) विषय बनला आणि नंतर राज्यभर देखील या रताळ्याची चर्चा होताना पाहायला मिळत आहे.
संगमनेर तालुक्यातल सावरगाव तळ हे गाव रताळ्याचे गाव म्हणून परिचित होते. या परिसरातील शेतजमीन ही मुरमाड आणि हलक्या प्रतीची असल्याने येथे रताळे चांगले पिकतात. हिराबाई नेहे यांनी मात्र आपल्या शेतात रताळे नव्हे तर कांद्याची लागवड केली होती. कांद्याच्या पिकाच्या बांधाजवळ त्यांनी रताळ्याचा केवळ एक वेळ लावला होता आणि या वेलाला एकच रताळे लागले ते देखील सात किलो वजनाचे भरले. हिराबाई नेहे यांनी या वेलाची पाहणी केली आणि काही रताळे लागले की नाही या उत्सुकतेपोटी त्यांनी तपासले असता त्यांना एक रताळे आढळून आले. त्याचे वजन सात किलोचे भरले आहे.
रताळे पाहण्यास गर्दी
सात किलोचे रताळे लागल्याची बातमी परिसरात अत्यंत वेगाने पसरली आणि जनमानसात कुतूहलाची भावना जागृत झाली. परिसरात या रताळ्याचीच चर्चा शेतकऱ्यात सुरु झाली आणि रताळे पाहण्यासाठी देखील गर्दी होऊ लागली. हिराबाई नेहे यांनी ही काय किमया केली अशी उत्सुकता शेतकऱ्यांना लागली पण ही आपली नव्हे तर निसर्गाची किमया असल्याचे हिराबाई सांगत आहेत. सात किलोचे रताळे पाहण्यासाठी गावातील आणि परिसरातील लोक हिराबाई यांच्या घरी येत आहेत आणि मोठ्या कुतूहलाने सात किलोचे हे रताळे (crowds to see the seven kilograms of Sweet Potato) पहात आहेत.
पूर्ण नैसर्गिक !
अलीकडे कृषी क्षेत्रात सतत वेगवेगळे प्रयोग होत असतात त्यामुळे उत्पादन वाढत असते. फळांचे आकार वाढलेले पहायाला मिळतात पण त्यासाठी बियाणे, खते, औषधे असा सगळा प्रयोग केलेला असतो. हिराबाई यांनी लावलेल्या वेलाला कसलेही औषध नाही की बियाणे संकरीत नाही. या वेलाला रासायानिकच नव्हे तर साधे खत देखील घातलेले नव्हते परंतु रताळे मात्र सात किलोचे आले आणि चर्चेचा विषय बनला.
दुसरी घटना !
सात किलोचे रताळे लागण्याची ही दुसरी घटना आहे. राहता तालुक्यात पिंपरी निर्मळ येथील ग्रामपंचायत सदस्य सोपान निर्मळ यांनी देखील रताळे लागवड केली होती, काढणी सुरु असताना मागील वर्षी त्यांच्याही शेतात सात किलो वजनाचे एक रताळे आढळून आले होते आणि यावेळी देखील हे रताळे पाहण्यासाठी गावकऱ्यानी गर्दी केली होती. त्यानंतर आता सावरगाव तळ येथे हिराबाई नेहे यांच्या शेतात याच घटनेची पुनरावृत्ती झाली आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !