BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१ ऑक्टो, २०२२

धामण समजून बसला, हाताला मण्यार डसला !




शोध न्यूज : धामण समजून मण्यारसारख्या विषारी सापाशी खेळण्याचे धाडस केले आणि जिवाला मुकावे लागल्याची घटना समोर आली आहे.


अलीकडे अनेकजण साप नागाशी खेळताना दिसतात आणि त्याचे व्हिडीओ बनवतात. विषारी नागाचा किस घेण्याचे धाडस करतानाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर देखील पाहायला मिळतात परंतु हे अनेकदा जीवावर बेतत असते. सर्पमित्र साप, नाग पकडताना पाहून अथवा त्यांचे व्हिडीओ पाहून काही जण तसे करण्याचा प्रयत्न करतात आणि त्यात फसतात. काही नवशिके सर्पमित्र जेंव्हा फाजील आत्मविश्वास दाखवतात तेंव्हा देखील त्यांच्या जीवाला धोका होतो.  अर्धवट ज्ञान हे नेहमीच धोक्याचे असते.  अशाच अर्धवट ज्ञानामुळे एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला असल्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 


साप पकडणे ही एक कला तर आहेच परंतु साप पकडताना हा साप कोणत्या जातीचा आहे इथपासून सापांच्या बाबतीत पुरेपूर माहिती असणे आवश्यक असते. पकडू पहात असलेला साप हा विषारी आहे काय ? याचा अभ्यास असणे आवश्यक आहे. अभ्यास आणि ज्ञान नसताना धाडस करण्याचा प्रयत्न हा निश्चितपणे जीवावर बेतू शकतो. अशाच अज्ञानामुळे वर्ध्यातील एका युवकाला आपल्या जीवाला मुकावे लागले आहे. सानेवाडी येथील बबलू काकडे या तरुणाने एक साप पकडला आणि आपण साप पकडण्यात किती तरबेज आहोत हे दाखविण्याचा वारंवार प्रयत्न केला . प्रत्यक्षात त्याला सापांच्या बाबतीत काहीही अभ्यास अथवा माहिती नव्हती हे नंतर सर्वांच्या लक्षात आले. 


आपण पकडलेला साप हा धामण असल्याचे तो गावकऱ्याना सांगत होता. परंतु प्रत्यक्षात तो विषारी मण्यार होता. धामण समजून त्याने हातात घेवून गावभर फिरला आणि आपला साप पकडण्याचा पराक्रम लोकांना दाखवत राहिला. मण्यार हातात घेवून तो गावभर फिरला पण त्याला या विषारी सापाने दंश केला पण 'आपल्याला काही होत नाही' असे सांगत तो किती तरबेज आणि निडर आहे हे भासवत राहिला. सर्पमित्र म्हणवून घेणाऱ्या या तरुणाने विषारी मण्यारला धामण समजण्याची मोठी चूक केली होती आणि हीच चूक त्याला प्रचंड महागात पडली. 

 

पेंटिंग व्यवसाय करणारा बबलू काकडे याच्याच घरात हा साप निघाला होता आणि त्यानेच तो पकडला होता. सापाबाबत त्याला फारशी माहिती नव्हती तरीही त्याने हे धाडस केले. अर्थात हा साप बिनविषारी धामण आहे असा त्याचा समज झाला आणि तेथेच तो फसला . बिनविषारी साप म्हणूनच त्यानेही तो पकडण्याचे धाडस केले. साप पकडला एवढ्यावर तो थांबला नाही तर तो याच सापाबरोबर खेळत राहिला. त्याने तो साप आपल्या पँटच्या खिशातही घातला. हा सर्व प्रकार लोक पहात होते, कुणी व्हिडीओ बनवत होते. लोक त्याला रोखण्याचा प्रयत्न करीत होते पण कुणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीत तो नव्हता. 


मण्यार सापाने त्याला दंश करून देखील तो गाफील राहिला. धामण चावल्याने काही होत नाही हे त्याने इतरांनाही सांगितले आणि घरी जाऊन झोपला. त्यांनतर मात्र त्याला त्रास होऊ लागला, उलट्याही झाल्या. काही वेळात त्याची प्रकृती एकदम बिघडली आणि त्याला घाइघाइने जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले परंतु दुर्दैवाने रुग्णालयात पोहोचण्याच्या आधीच त्याचा मृत्यू झाला होता. (Unnecessary daring, death of youth from snakebite) अज्ञानापोटी केलेले धाडस त्याच्या जीवावर बेतले असून असे धाडस करणाऱ्यासाठी हे एक मोठे उदाहरण आहे.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !