पाथर्डी : कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून अवघे जग हैराण झाले आहे पण असे एक गाव आहे की या गावात अजून कोरोन पोहोचू शकला नाही, पाथर्डी तालुक्यातील अंबिकानगर या गावाला अजून कोरोनाची कसलीही झळ बसली नाही.
गेल्या दोन वर्षांपासून जगभरात कोरोनाशिवाय दुसरा विषयच जन्माला आला नाही. कोरोनाच्या संकटाचा सामना करता करता माणूस थकून गेलाय. संचारबंदी, निर्बंध, मास्क वगैरे सांभाळण्यात दोन वर्षे गेली आहेत. पहिली, दुसरी आणि आता तिसरीही लाट आली आहे पण अंबिकानगर गावाच्या सुज्ञ ग्रामस्थांनी कोरोनाला वेशीच्या आत येऊ दिले नाही. या गावातील एकही व्यक्तीला कोरोनाची बाधा अद्याप झालेली नाही. पाथर्डी पासून पंचवीस किमी अंतरावरील हे गाव साधारण बाराशे लोकवस्तीचे आहे. बीड जिल्ह्याच्या हद्दीपासून अवघ्या दोन किमी अंतरावर हे गाव वसलेले आहे. इतर गावासारखेच हे देखील गाव आहे पण कोरोनाला शिरकाव करू दिला नाही हे या गावाचे वेगळेपण आहे.
जगात काही गावे अशी आहेत की तेथे आजवर कोरोना प्रवेश करू शकला नाही पण महाराष्ट्रातील हे गाव देखील आपले वेगळेपण टिकवून आहे. या गावातील लोक प्रामुख्याने कष्टकरी आहेत आणि कामाच्या निमित्ताने त्यांना बाहेरगावी ये जा करावी लागतेही. रोजीरोटीचा प्रश्न त्यांच्यासमोरही आहे पण या गावाच्या सरपंच सत्यभामा ढाकणे यांनी असे काही नियोजन केले की कोरोना देखील या गावात जायला घाबरला. दुर्दैवाने पंधरा दिवसांपूर्वीच महिला सरपंच सत्यभामा ढाकणे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. सलग तीन पंचवार्षिक काळात त्याच इथल्या सरपंच होत्या आणि त्यांनी आपल्या गावाला कोरोनाच्या संकटात सुरक्षित ठेवले आहे.
कुठल्या ना कुठल्या निमित्ताने या गावाचा संपर्क पाथर्डी, बीड, शिरूर तालुका अशा भागाशी नित्याचा आहे. कोरोनाला घाबरून इथले लोक काही घरात बसलेले नाहीत पण कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे त्यांनी अगदी काटेकोरपणे पालन केले आहे. प्रत्येक नियम या गावाने काळजीपूर्वक पाळला आहे त्यामुळे गावाच्या वेशीतसुध्दा कोरोनाने शिरकाव केला नाही. महिला सरपंच सत्यभामा ढाकणे यांनी नियमित गावकऱ्यांच्या संपर्कात राहून त्यांना प्रबोधन केले. मास्क, सॅनिटायझर यांचे मोफत वाटप केले. गावकऱ्यांनी देखील अत्यंत दक्षता घेत नियमनाचे पालन केले. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाल्यापासून शासन आणि प्रशासन नियमांबाबत नागरिकांना जागरूक करतेय, सतत आवाहन करतेय पण आजही नियमाकडे दुर्लक्ष करणारी बेफिकीर मंडळी आपल्या आजूबाजूला दिसतात. नियम पाळले तर कोरोना जवळ फिरकत देखील नाही हेच या गावाने दाखवून दिले आहे.
कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करणे हाच कोरोना प्रतिबंधाचा मुख्य उपाय असल्याचे वारंवार शासन सांगत राहिले, दंडाची आकारणी करण्यात येऊ लागली. लोक दंड भरीत राहिले पण कोरोना प्रतिबंधात्मक नियमांकडे दुर्लक्ष केले. अजूनही अनेक लोक असे आहेत की त्यांनी या महाभयानक महामारीला देखील गंभीरपणे घेतल्याचे दिसत नाही, कारवाईच्या भीतीने मास्क वापरला जातो पण तो गळ्यात लटकता ठेवलेला असतो. कुणी हटकले अथवा कारवाईचा प्रसंग समोर आला की मग तो तोंडावर ओढला जातो. आपल्या सुरक्षेची ज्याला चिंता नाही तो इतरांची सुरक्षा काय घेणार ? पण अंबिकानगर या छोट्याशा गावाने या सगळ्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले आहे हे मात्र नक्की !
वाचा : >>
- पंढरपूर, सांगोला तालुक्यात एकाच रात्री १४ दुकाने फोडली !
- हॉटेल मालकाचाच चोराला महागडा मोबाईल पण --
- सहा महिन्यात दुप्पट रक्कम : आणखी तक्रारी दाखल !
- ऊसाचा बिलातून वीज बिल वसुलीला सुरुवात !
- खा. सुप्रिया सुळे यांनी केली पंतप्रधानांची पोलखोल !
- पंढरपूर दिंडीतल्या वारकऱ्यांमुळे भीषण अपघात !

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !