BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

८ फेब्रु, २०२२

पंढरपूर, सांगोला तालुक्यात चोरांनी उडवली झोप !

 




पंढरपूर : पंढरपूर आणि सांगोला तालुक्यात एकाच रात्री चोरांनी चौदा दुकाने फोडली असून या घटनेने दुकानदार आणि नागरिकांची झोप उडवली आहे.


अलीकडे सगळीकडेच चोऱ्यांचे प्रमाण भलतेच वाढले असून चोरांचे धैर्य देखील वाढलेले दिसत आहे. घर बंद दिसले की त्या घरात हमखास चोरी होत आहे, रात्रीच्या वेळी दुकाने फोडण्याचेही प्रकार अलीकडे वाढीला लागलेले दिसत आहेत. साहजिकच या वाढत्या चोऱ्यामुळे नागरिक आणि दुकानदार धास्तावलेले आहेत. पंढरपूर तालुक्यात सुस्ते येथे आणि सांगोला तालुक्यातील बामणी येथे एकाच रात्री अनेक दुकाने फोडण्याचे धाडस चोरांनी केले आहे त्यामुळे तर चिंता अधिक वाढली आहे. 



पंढरपूर तालुक्यात सुस्ते येथे एका रात्रीत चोरट्यांनी सहा दुकाने फोडली आहेत. या चोरीसाठी गॅस कटरचा वापर करण्यात आला असून बाजूचे पत्रे उचकटण्यात आले आहेत. सुस्ते येथे वेगवेगळ्या प्रकारची दुकाने फोडण्यात आली आहेत. यात संतोष पवार यांचे कृषी केंद्र, सचिन वाघमारे  यांची मोबाईल शॉपी, ज्ञानेश्वर पवार यांचे कापडाचे दुकान, संचित कदम यांचे कृषी केंद्र,  भारत पाटील यांचे हार्डवेअरचे दुकान, उमेश पवार यांचे इलेक्ट्रॉनिक दुकन यांचा समावेश आहे.  दुकानाच्या मागील बाजूने गॅस कटरने पत्रा कापून चोरांनी दुकानात प्रवेश केला आणि माल चोरून नेला आहे. 


ज्ञानेश्वर पवार यांच्या कापड दुकानातून सुमारे साठ हजार रुपयांचे कपडे चोरीला गेले तर सचिन वाघमारे यांच्या मोबाईल शॉपीमधून दुरुस्तीला आलेले तीन मोबाईल चोरांनी चोरून नेले आहेत. एकाच रात्री तब्बल सहा दुकाने फोडल्यामुळे नागरिक आणि दुकानदार पुरते धास्तावून गेले आहेत. सुस्ते येथे यापूर्वी देखील अशाच प्रकारच्या चोऱ्या झाल्या आहेत. पंढरपूर शहर, उपनगरे आणि तालुक्याचा ग्रामीण भाग येथे सतत चोरी होण्याच्या घटना घडत आहेत त्यामुळे चिंता व्यक्त होऊ लागली आहे. काही करून या चोरांचा बंदोबस्त होण्याची गरज असल्याचे मत ग्रामीण भागातून व्यक्त होऊ लागले आहे. 


सांगोला तालुक्यातील कोळे  येथेही एका घरातून ८० हजार रुपयांचा ऐवज चोरटयांनी लंपास केला आहे. कोळा येथील सोपान खंडागळे यांनी उकाड्यामुळे रात्री दरवाजा उघड ठेवला होता. हा उघडा दरवाजा चोरांना आयतेच निमंत्रण देत होता. दरवाजा उघड ठेवून खंडागळे कुटुंबीय झोपले असता रात्री चोरांनी घरात प्रवेश केला आणि दागिन्यांची चोरी केली. रोख रक्कम ५५ हजार आणि सहा ग्रॅम सोन्याची अंगठी असा ८० हजार रूपांचा ऐवज चोरटयांनी चोरून नेला आहे. मध्यरात्री खंडागळे पाणी पिण्यासाठी उठले असता त्यांनी घरातील लाईट सुरु केली तेंव्हा सामान अस्ताव्यस्त दिसून आले. त्यामुळे घरात चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. 


बामणी येथेही दोन शॉपिंग सेंटर मधील आठ दुकाने एकाच रात्री फोडण्याची घटना घडली आहे. ८ दुकान गाळ्यांचे शटर उचकटून चोरांनी चोरी केली आहे. हिंद केसरी शॉपिंग सेंटरमधील दुकानातील रोख १५ हजार, किराणा माल तर त्या शेजारील मेडिकल दुकानातील रोख अडीच हजार आणि अन्य साहित्य याची चोरी झाली आहे. कृषी केंद्र, ऑनलाईन सेवा, मेडिकल, गॅरेज अशा वेगवेगळ्या आठ दुकानातून रोख रक्कम आणि साहित्य चोरांनी लंपास केले आहे. पंढरपूर - सांगोला मार्गावर असलेल्या शॉपिंग सेंटरमधील आठ दुकाने एकाच रात्री फोडण्यात आल्याने तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.              

आणखी बातमी :>>



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !