BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

८ फेब्रु, २०२२

पंढरीच्या वारकऱ्यांमुळे भीषण अपघात !

 



नागज : माघ वारीसाठी पंढरीला निघालेल्या दिंडीतील वारकऱ्यांस वाचविण्याच्या प्रयत्नात झालेल्या भीषण अपघातात आपल्या नातेवाईकाकडे निघालेले दाम्पत्य जागीच ठार झाले तर पाच जण जखमी झाले आहेत. 


मिरज ते सांगोला हा मार्ग सिमेंटचा आणि रुंद झाल्यापासून या मार्गावरील अपघाताचे प्रमाण वाढलेले असून अजूनही काही ठिकाणी रस्त्याचे काम अपूर्ण आहे त्यामुळे या रस्त्यावरून अत्यंत सावधगिरीने वाहने चालवावी लागतात. या मार्गावर सतत अपघाताचा धोका असतो आणि आज पुन्हा एकदा अपघात होऊन पती पत्नीला आपला जीव गमाविण्याची वेळ आली आहे. माघ वारी जवळ असल्याने राज्यातील अनेक वारकरी दिंडी घेऊन पंढरीच्या दिशेने निघालेले आहेत. अशीच एक वारकरी दिंडी पंढरीकडे जात असताना अचानक एक वारकरी भरधाव वेगाने जाणाऱ्या कारला आडवा गेला. या वारकऱ्याला वाचविण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाला. 


सांगली जिल्ह्यातील कवठे महांकाळ तालुक्यातील विठ्ठलवाडी गावाजवळ हा भीषण अपघात घडला. पंढरपूरच्या दिशेने वारकरी दिंडी निघाली असताना दिंडीतील एक वारकरी अचानक रस्त्याच्या मध्ये आला. याचवेळी भरधाव वेगाने एक कार पंढरपूरच्या दिशेने निघाली होती. सांगली जिल्ह्यातील कसबे डिग्रज येथील चव्हाण कुटुंबीय आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी बीड येथे निघाले होते. भरधाव वेगाने चाललेल्या कारच्या आड हा वारकरी आल्याने त्याला वाचविण्याचा चालकाने प्रयत्न केला. या प्रयत्नात वेगात असलेली कार एका ढिगाऱ्यावरून उडाली आणि पंधरा फुट उंच उडून पुढे रस्त्यावर पलटी झाली. हा अपघात  अत्यंत भयानक आणि भीषण होता. अपघात पाहणाऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकला होता. 


भरधाव वेगाने निघालेली कार पंधरा फुट उडून पलटी झाल्याने कारमधील पृथ्वीराज चव्हाण आणि त्यांच्या पत्नी प्रियांका पृथ्वीराज चव्हाण हे दाम्पत्य जागीच मृत्युमुखी पडले आहे तर गाडीतील अन्य चार जण जखमी झाले आहेत. सांगली जिल्ह्यातील कसबे डिग्रज येथील हे दाम्पत्य बीडला निघाले होते परंतु वाटेतच काळाने हा घाला घातला. 


मोकळा रस्ता असल्याने कार वेगाने निघालेली होती परंतु काही कळायच्या आत एक वारकरी आडवा आला. त्याचा जीव वाचविण्याच्या नादात पती पत्नीचा जीव या अपघातात गेला आहे.  कारमधील चार जण आणि एक पादचारी असे पाच जण या अपघातात जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी कवठे महांकाळ येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 


वाचा : >> 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !