सोलापूर : कोरोनाची तिसरी लाट वाढत असताना माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा महामंडळांच्या परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार आणि ऑफलाईनच घेण्यात येतील अशी माहिती महामंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली आहे.
दहावी, बारावीतील विद्यार्थी सर्वाधिक ग्रामीण भागातील आहेत आणि तेथील अपुऱ्या सोयी सुविधामुळे ऑनलाईन परीक्षा घेणे शक्य होणार नाही त्यामुळे या परीक्षा ऑफलाईन होणार आहेत. अजूनतरी नियोजित वेळापत्रकात कुठलाही बदल करण्यात आलेला नाही त्यामुळे विद्यार्थ्यांनी कुठल्याही अफवावर विश्वास ठेवू नये असे आवाहन बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी केले आहे.
मागच्या वर्षी कोरोनामुळे दहावी बारावी परीक्षेबाबत बराच गोंधळ निर्माण झाला होता तर कित्येक काळ विद्यार्थी संभ्रमात होते. यावेळी दहावी बारावीच्या परीक्षा विनाविघ्न आणि विनाव्यत्यय होतील असे वाटत असतानाच कोरोनाची तिसरी लाट आपला प्रभाव दाखवू लागली आहे. नुकत्याच सुरु झालेल्या शाळाही बंद पडल्या आहेत तर परीक्षेबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. यावेळीही ऐन परीक्षेच्या आधीच कोरोनाची तिसरी लाट प्रभावी झाली आहे त्यामुळे दहावी बारावीच्या परीक्षा होतील काय ? झाल्या तर त्या ऑनलाईन होती की ऑफलाईन ? असे प्रश्न विद्यार्थ्यांसमोर उभे राहिले आहेत पण आता या प्रश्नांची उत्तरे मिळाली आहेत.
राज्यात कोरोनाचे सद्याचे निर्बंध १५ फेब्रुवारी पर्यंत आहेत त्यामुळे परीक्षा पुढे ढकलल्या जाताहेत की काय असाही संभ्रम निर्माण होऊ लागला होता पण तसे काही घडणार नाही. दहावी, बारावीच्या परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार आणि ऑफलाईनच होतील अशी माहिती बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली आहे. प्रात्यक्षिक परीक्षेचा कालावधी पूर्ण होईपर्यंत सोयीनुसार ती परीक्षा घेता येईल असेही त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे आता संभ्रमाची अवस्था शिल्लक उरण्याचे कारणच उरलेले नाही. कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा अनुकूल परिणाम दिसत असल्याने परीक्षेपूर्वी दहावी आणि बारावीच्या सर्व विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात येणार आहे त्यामुळे नियोजित वेळापत्रकानुसार परीक्षा घेण्यात काही अडचण येणार नाही असे बोर्डाला वाटते.
बारावीची परीक्षा आधी सुरु होत असून त्यांची प्रात्यक्षिक परीक्षा १४ फेब्रुवारी ते ३ माच या काळात आणि दहावीची प्रात्यक्षिक परीक्षा २५ फेब्रुवारी ते १४ मार्च या कालावधीत होईल. बारावीची लेखी परीक्षा ४ मार्च ते ७ एप्रिल तर, दहावीची लेखी परीक्षा १५ मार्च ते १८ एप्रिल या कालावधीत होत आहे. प्रात्यक्षिक परीक्षेसाठी २२ दिवसांचा अवधी असून शाळा, महाविद्यालये कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन या कालावधीत त्यांच्या सोयीनुसार घेण्यात यावी असे बोर्डाने सांगितलेले आहे. तरीही परीक्षेवेळी सर्वाधिक प्राधान्य विद्यार्थ्यांच्या आरोग्याला दिले जावे अशा सूचनाही देण्यात आलेल्या आहेत.
वाचा : पंढरपूर तालुक्यात भरदिवसा मोठी चोरी !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !