राष्ट्रवादी जोरात,
शिवसेना कोमात !
पंढरपूर : सोलापूर जिल्ह्यातील पाच नगरपंचायतीत राष्ट्रवादी कॉंग्रेसची दोन ठिकाणी सरशी झाली असून काँग्रेस पक्षानेही माढ्यात बाजी मारली पण राज्याचे मुख्यमंत्रीपद असलेल्या शिवसेनेला एकही ठिकाणी विजय संपादन करता आला नाही.
सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस, वैराग्य, नातेपुते, माढा, श्रीपूर-महाळुंग नगरपंचायतीचा निकाल घोषित झाला असून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांनी बाजी मारली पण शिवसेनेला खाली मान घालण्याची वेळ आली. राष्टवादीने वैराग्य आणि श्रीपूर महाळुंग नगरपंचायतीत बाजी मारली तर माढा येथे काँग्रेस पक्षाने आपले वर्चस्व सिद्ध केले, माळशिरस नगरपंचायतीत मोहिते पाटील समर्थकांनी अपेक्षेप्रमाणे बाजी मारली त्यामुळे हा विजय भाजपच्या खात्यात गेला. नातेपुते नगरपंचायतीत जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख यांनी वर्चस्व मिळवले आहे पण शिवसेनेला मात्र इतरांचा विजय पाहत बसण्याची वेळ आली. देशमुख हे मोहिते पाटील यांचेच समर्थक आहेत.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असले तरी नगरपंचायतीत ही आघाडी दिसली नाही. आघाडीतील तीनही पक्ष परस्परांच्या विरोधात लढले. या निकालाने या भागात आजही कुठल्या पक्षाची शक्ती आहे हेच या निवडणूक निकालाने दाखवून दिले आहे. राज्यात सत्तेत असताना आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख मुख्यमंत्री पदावर असतानाही शिवसेनेला अपेक्षित यश मिळाले नाही. सोलापूर जिल्हयात आणि विशेषतः पंढरपूर विभागात आता पूर्वीची शिवसेना राहिली नसल्याचे स्पष्ट करणारे हे निकाल ठरले आहेत त्यामुळे शिवसेनेला वरिष्ठ पातळीवरून गंभीरपणे विचार करायला लावणारा हा निकाल ठरला आहे.
माळशिरस नगरपंचायतीत भाजपाला दहा जागांवर विजय मिळाला तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दोन आणि महाविकास आघाडी पॅनलने दोन जागा मिळवल्या. तीन जागांवर अपक्ष उमेदवार निवडून आले आणि भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला. नातेपुते नगरपंचायतीसाठी पहिल्यांदाच झालेल्या मतदानात मोहिते पाटील समर्थक असणारे बाबाराजे देशमुख यांच्या पॅनलचे सरशी झाली आहे. वैराग येथेही नव्याने नगरपंचायत झाली असून येथे राष्ट्रवादीचे निरंजन भूमकर यांनी वर्चस्व कायम राखले. महाळुंग - श्रीपूर या नव्या नगरपंचायतीत देखील राष्ट्रवादी काँग्रेसने सहा जागांवर विजय मिळवला आहे. काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पक्ष याना प्रयेकी एका जागेवर समाधान मानावे लागले आहे. स्थानिक आघाडीचे भीमराव रेडे यांच्या गटाला पाच तर मुंडफणे गटाला चार जागांवर विजय मिळवता आला आहे. येथील सत्तेचे गणित आता आघाडीच्या नेत्यावर अवलंबून असणार आहे.
माढा नगरपंचायतीत सत्ताधारी गटाने दणदणीत विजय संपादन केला आहे. काँग्रेस पक्षाने सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. येथे राष्ट्रवादी काँग्रेसने दोन शिवसेनेसह अपक्षांना तीन जागा मिळाल्या आहेत. पाचही नगरपंचायतीत शिवसेनेच्या वाट्याला अपेक्षित यश आले नाही त्यामुळे शिवसेनेची झाकली मूठ या निकालाने उघडली आहे. राष्ट्रवादीची शक्ती मजबूत असल्याचे या निवडणुकीत दिसून आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !