पंढरपूर : माहेरहून चार लाख रुपये घेऊन येण्यासाठी आपला छळ होत असल्याची तक्रार पंढरपूर शहरातील एका विवाहितेने शहर पोलिसात दिली असून पती आणि सासूच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हुंडाविरोधी कायदा कितीही कडक केला तरी पैशाचे लोभी नात्याला कलंक लावत आपल्याच घरातील विवाहित तरुणींचा छळ करीत असल्याच्या अनेक घटना समोर येत असतातच. कधी सुनेला पेटवून दिले जाते तर कधी तिच्यावर विषप्रयोग केला जातो. कित्येकदा सासरच्या छळाला वैतागून सुनेची आत्महत्या समोर येते. भिक्कारछाप मंडळी गाडी घेण्यासाठी अथवा तत्सम कारणासाठी सुनेला, पत्नीला माहेराहून पैसे आणण्यासाठी त्रास देत असतात. हा त्रास अगदीच असह्य झाल्यानंतर प्रकरण पोलिसांपर्यंत जात असते. पंढरपूर येथील एका विवाहितेने देखील आपला पती आणि सासूच्या विरोधात पोलिसात धाव घेतली आहे.
शेती आणि टिप्पर घेण्यासाठी तसेच घर बांधण्यासाठी माहेरहून चार लाख रुपये घेऊन ये म्हणत पती आणि सासू आपला छळ करीत आहेत अशी फिर्याद शिल्पा लक्ष्मण उर्फ अभिजित शिंदे या विवाहित महिलेने पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. पंढरपूर येथील उमा महाविद्यालयाजवळ राहणारे पती लक्ष्मण उर्फ अभिजित बापूराव शिंदे आणि सासू शांता बापूराव शिंदे यांच्याविरोधात विवाहितेने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार शिल्पा आणि अभिजित यांचा विवाह २००६ मध्ये झाला होता. विवाहाच्या वेळेस शिल्पा यांच्या माहेरच्या लोकांनी सर्व मानपान, प्रापंचिक साहित्य आणि १२ तोळे सोने शिंदे यांना दिले होते. लग्नानंतर सहा महिने शिल्पा याना व्यवस्थित नांदवले पण त्यानंतर तिचा छळ सुरु झाला. पती अभिजित शिंदे दारू पिऊन रोज शिवीगाळ आणि दमदाटी करू लागला. सासू शांता शिंदे देखील संगनमत करून शिल्पाला त्रास देऊ लागली. हा त्रास वाढतच गेल्याने शिल्पा माहेरी निघून गेली.
शिल्पा माहेरी गेल्यानंतर पती लक्ष्मण उर्फ अभिजित शिंदे याने दुसरे लग्न केले, काही दिवसांनी मात्र लक्ष्मण याने शिल्पाला नांदविण्यास पुन्हा घरी आणले. त्यानंतर देखील पती आणि सासू शिल्पाचा पुन्हा छळ करू लागले. माहेराहून पैसे आणण्यासाठी शारीरिक, मानसिक छळ सुरु केला. दमदाटी करत उपाशीही ठेऊ लागले तसेच चारित्र्यावर संशय घेऊ लागले. शिल्पाच्या आईलाही फोनवरून शिवीगाळ करू लागले. हा सगळा त्रास असह्य झाल्यावर शिल्पा शिंदे या विवाहित महिलेने पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात पती आणि सासूच्या विरोधात फिर्याद दिली असून त्यानुसार पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !