पंढरपूर : पुन्हा एकदा चोरट्यांनी आपला चमत्कार दाखवला असून तालुक्यातील कोर्टी येथे भरदिवसा दोन लाखांची चोरी होण्याची घटना घडली असून दिवसाढवळ्या झालेल्या या चोरीमुळे नागरिक पुन्हा भयभीत झाले आहेत.
गेल्या काही महिन्यांपासून पंढरपूर शहर आणि तालुका चोरांसाठी खुला झाल्यासारखा झाला आहे. शहर, उपनगरे आणि तालुक्याच्या ग्रामीण भागात घरफोडीसारखे प्रकार सतत होताना दिसत आहेत. आता तर भर दिवसाच चोरांनी कोर्टी येथे डल्ला मारला आहे. घराचा बंद दरवाजा म्हणजे चोरांना खुले निमंत्रण असते पण आता भर दिवसही शेतकऱ्याने घराला कुलूप लावून आपल्या शेतात काम करायला जाणे कठीण होऊन बसले आहे. घरातील मालमत्तेचे रक्षण करायचे असेल तर दिवसही घरात कुणीतरी असायलाच हवे अशीच शिकवण चोरींच्या घटनेतून मिळू लागली आहे.
कोर्टी येथील श्रीराज बाळासाहेब लवटे यांचे कोर्टी हद्दीत घर आहे तर शेती कोर्टी आणि गादेगाव शिवारात आहे. शेतकरी कुटुंब म्हटलं की ते घरापेक्षा शेतीतच अधिक काळ असते. लवटे यांच्या कुटुंबही घराला कुलूप लावून आपल्या शेतातील कामासाठी गेले होते. शेतातील काम आटोपून श्रीराज आणि त्यांच्या पत्नी उज्वला हे दोघे सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास शेतातून घरी आले तेंव्हा त्यांना धक्काच बसला. घराच्या दरवाजाचे कुलूप तोडले असल्याचे चित्र त्यांना दिसले. घरात जाऊन पहिले असता घरातील तीनही कपाटे उघडी असलेली त्यांना दिसली घडलेला एकूण प्रकार त्यांच्या लक्षात आला. दागिने आणि रोख रक्कम यावर चोरट्यांनी हात साफ केला होता.
सोन्याचे दोन नेकलेस, एक तोळे सोन्याचे गंठण, सोन्याचे डोरले, टॉप्स, झुबे, रिंग, अंगठी आदी दागिने चोरटयांनी लंपास केल्याचे लवटे कुटुंबाला दिसले. दागिन्यांसह घरात असलेले सात हजार रुपये रोख रक्कमही चोरांनी चोरून नेली. दागिने आणि रोख रक्कम असे मिळून एकूण १ लाख ८९ हजार ४५० रुपयांचा ऐवज चोरटयांनी भरदिवसा लांबवला. या घटनेची माहिती मिळताच परिसरात खळबळ उडाली. भर दिवस चोर घरात घुसून चोरी करून गेले याचे आश्चर्य तर वाटलेच पण परिसरात घबराट देखील निर्माण झाली आहे.
ग्रामीण भागात शेतकरी घराला कुलूप लावून शेतात जातात आणि संपूर्ण दिवस संपूर्ण कुटुंब शेतात कष्ट करीत असते. दिवसाही चोरीच्या घटना घडू लागल्या तर शेतकऱ्यांनी काय करावे? असा प्रश्न या चोरीने निर्माण केला आहे. ग्रामीण भागातील शेतकरी दिवसभर शेतात काबाडकष्ट करीत असतो. शिवाय अनेक शेतकरी वस्तीवर देखील राहात असतात. निमनुष्य परिसरात एकटी वस्ती असते आणि सगळे कुटुंब शेतात राबत असते त्यामुळे अशी घरे चोरट्याना दिवसही निमंत्रण देणारी ठरत असतात. कोर्टी येथील चोरीच्या घटनेबाबत पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली असून अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
सोनके येथेही चोरी !
पंढरपूर तालुक्यातील सोनके येथेही चोरीच्या दोन घटना घडल्या आहेत. दोन ठिकाणच्या चोरीत दागिने आणि रक्कम असे मिळून ४८ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला आहे. या घटनेची फिर्याद पंढरपूर ग्रामीण पोलिसात देण्यात आली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !