महूद : रस्त्यावर सायकल खेळत असलेल्या बालकाला एका ट्रॅक्टरने चिरडल्याने बालकाचा मृत्यू झाला असून या घटनेने प्रचंड ह्ळहळ आणि बेमुर्वत ट्रॅक्टर वाहुकीबाबत प्रचंड संताप व्यक्त होत आहे.
ट्रॅक्टर चालक केवळ रस्त्यावरील निष्पाप जीव घेण्यासाठीच जन्माला आलेले आहेत याचा पर्याय पुन्हा एकदा आला असून ट्रॅक्टरना रस्त्यावर येण्याचीच बंदी करावी एवढा उत्पात या ट्रॅक्टर चालकांनी मांडला आहे. भरधाव वेग, कर्णकर्कश गाणी, वाहतुकींच्या नियमांचा बोजवारा, क्षमतेपेक्षा अधिक ऊस आणि एका ट्रॅक्टरला अनेक ट्रॉली हे चित्र जवळपास सगळ्याच ट्रॅक्टर वाहतुकीत दिसते आणि माणसं मारत जखमी करीत हे धावत असतात. यांच्यावर कुणाचेच नियंत्रण नसते आणि त्यांना पादचारी, दुचाकीस्वार यांच्या जिवाचीही पर्वा नसते. अशाच बेपर्वाईत अवघ्या आठ वर्षे वयाचा बळी देखील ट्रॅक्टरने घेतला.
खेळता खेळता लहान मुलाचा असा अपघाती मृत्यू झाल्याने परिसर हादरला असून पालकांची झोप उडवणारी घटना सांगोला तालुक्यातील वाकी हलदहिवडी येथे घडली आहे. सांगोला तालुक्यात वाकी हलदहिवडी मार्गावरील कुंभार मळा येथे अत्यंत दुर्दैवी घटना घडल्याचे समोर आले. वाकी विद्यामंदिर येथे चौथ्या इयत्तेत शिकणारा अवघ्या आठ वर्षे वयाचा संग्राम आप्पासाहेब शेजाळ हा दुपारच्या वेळेस घराच्या जवळच रस्त्यावर सायकल खेळत होता. सायकल खेळण्यात दंग असलेला संग्राम सायकलचा आनंद घेत होता पण रस्त्याच्या कडेला खेळता खेळता एका ट्रॅक्टरने त्याला चिरडले. त्याच्या कंबरेवरून ट्रॅक्टरचे चाक गेले. संग्रामला तातडीने उपचारासाठी सांगोला येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. नंतर पंढरपूर आणि पुढे सोलापूर येथील एका खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले. पण उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला आणि शेजाळ कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. याप्रकरणी ट्रॅक्टर चालक राहुल शिवाजी हांडे यांच्याविरोधात सांगोला पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अलीकडे मुलांकडे लक्ष देण्यास पालकांना वेळ नसतो त्यामुळे अनेक चित्र विचित्र घटना घडल्याचे पाहायला मिळते. मुलांच्या हातात मोबाईल दिला की पालकांना आपली जबाबदारी संपल्याचा भास होतो पण मुले काय पाहतात हे पाहणे देखील महत्वाचे असते. त्याचप्रमाणे मुलांना केवळ खेळायला पाठवून भागत नाही तर मुलांचे वय पाहून त्यांच्याकडे खेळतानाही लक्ष देण्याची किती गरज आहे हे सांगोला तालूक्यात घडलेल्या दुर्दैवी घटनेतून पुन्हा एकदा दिसून आले आहे.
सायकल खेळता खेळता असे काही होईल याची जाणीव कुणालाही झाली नव्हती पण ही दुर्दैवी घटना घडली. अभ्यासात आणि खेळात हुशार असणारा संग्राम असा खेळता खेळता गेल्याने परिसरात आणि त्याच्या शाळेत शोकाकुल वातावरण झाले. शाळेतील त्याचे मित्र आणि शिक्षक निशब्द झाले होते. खेळाचा आनंद घेता घेता संग्राम सगळ्यांना सोडून गेला ही कल्पना त्याच्या कुटुंबाला तर न पचवता येणारी आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !