औसा : अनेक आजार बरे होतात या समाजातून डबक्यातील पाणी नेण्यासाठी शेजारच्या जिल्ह्यातून गर्दी होऊ लागली असून या डबक्यातील पाणी भरभरून लोक घेऊन जात आहेत. पन्नास वर्षांपूर्वी करमाळा तालुक्यात देखील असाच प्रकार पाहायला मिळाला होता.
एखाद्या जगावेगळ्या गोष्टीची अफवा जरी उठली तरी लोक विश्वास ठेऊन अफवेच्या मागे धावत सुटतात. अलीकडचा काळ हा साठीच्या रोगाचा असून प्रत्येकाला सद्या आरोग्याची चिंता लागून राहिली आहे. काही झाले तरी आरोग्यासाठी पिण्याचे पाणी स्वच्छ असायलाच हवे. दुषित पाण्याने अनेक प्रकारचे आजार होतात हे सर्वांनाच माहित आहे तरीही एका वेगळाच प्रकार समोर आला आहे. एका डबक्यातील पाणी नेण्यासाठी शेजारच्या जिल्ह्यातून लोक येऊ लागले आहेत आणि डबक्यातील पाणी भरभरून घेवून जात आहेत. औसा तालुक्यातील एकंबीवाडी शिवारात हे चित्र पाहायला मिळत आहे.
एकंबीवाडी शिवारातील वनविभागाच्या क्षेत्रात असलेल्या एका डबक्यातील पाणी लोकांना जादुई वाटू लागले आहे. या डबक्यातील पाणी पिल्याने दमा, मधुमेह, रक्तदाब, मुतखडा असे विकार बरे होतात असा लोकांचा समज झाला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून लातूर, उस्मानाबाद, बीड, सोलापूर जिल्ह्यातील लोक हे दाबके शोधात येथे पोहोचत आहेत. हे पाणी नेण्यासाठी रोज येथे गर्दी होत आहे. विविध आजार या पाण्यामुळे बरे होतात असा लोकांचा समज झाला आहे आणि रोज ही बातमी दूरदूरपर्यंत पोहोचत आहे तशी येथील गर्दी वाढत चालली आहे.
एकंबीवाडी येथे ११० एकर वनविभागाची जमीन आहे, या परिक्षेत्रात विविध वृक्ष असून अनेक आयुर्वेदिक वनस्पती देखील आहेत. याच भागात पाच पाझर तलाव देखील आहेत. या परिसरातील या एका डबक्याचे महती मात्र दूरवर गेली आहे. या डबक्यात येणाऱ्या पाण्यात आयुर्वेदिक वनस्पतीच्या मुळातील रस मिसळतो आणि हे पाणी पिण्याने दमा, मधुमेह, अर्धांगवायू, अंगदुखी, पित्त, मुतखडा, गुडगेदुखी असे विविध आजार बरे होतात अशी अफवा सगळीकडे पसरली आहे आणि लोक विश्वास ठेऊन या डबक्याकडे धावत आहेत. लोक येत असल्याने या डबक्याभोवती आता दगडांचे कडे बांधण्यात आले आहे. या पाण्यामुळे आपले काही आजार बरे झाल्याचेही लोक सांगू लागले आहेत.
या पाण्याची एवढी चर्चा होऊनही पाण्याची अद्याप तपासणी करण्यात आलेली नाही शिवाय या पाण्यात कुठले घटक आहेत याला कसलाही शास्त्रीय आधार प्राप्त झालेला नाही. हे पाणी पिण्यासाठी योग्य आहे की नाही याचीही अजून कुणाला माहिती नाही. तपासणीनंतर पाण्याचे सत्य समजेल पण कुणीही कसल्याची भुलथापाना बळी पडू नये असे औसा ग्रामीण रुगांलायाचे वैद्यकीय अधिकारी सांगत आहेत. सदर प्रकार केवळ अंधश्रद्धा असून या पाण्याची तपासणी करण्याची मागणी अंधश्रद्धा निर्मुलन समितीने केली आहे.
वास्तविक हा प्रकार एवढा वाढला तरी प्रशासन कसे उघड्या डोळ्यांनी पाहत राहिले हेच मोठे कोडे बनले आहे. साथीच्या रोगाचे दिवस असताना आणि पर जिल्ह्यातून येऊन लोक हे डबक्यातील पाणी पीत आणि सोबत घेऊन जात असताना अजून या पाण्याची तपासणीही करण्याचे प्रशासनाला सुचलेले दिसत नाही. शास्त्रीय तपासणी करून लोकासमोर सत्य ठेवणे गरजेचे असताना असे काहीच न केल्याने लोकांचा विश्वास अधिक वाढत गेला आणि हे पाणी पिण्यायोग्य आहे की नाही हे माहित नसताना हे कथित जादुई पाणी परिसरातील जिल्ह्यांपर्यंत पोहोचत आहे. प्रशासनाने आत्ता तरी याच्या मुलाशी जाऊन लोकांना सत्य समजावून सांगावे अशी अपेक्षा जाणकार करीत आहेत.
करमाळा तालुक्यातील रायगाव येथेही पन्नास वर्षापूर्वी अशीच एका विहीर एका रात्रीत प्रसिद्धीला आली होती, गावाच्या जवळ असलेल्या विहिरीतील पाण्याने स्नान केल्यास महारोग बरा होतो अशी अफवा पसरली आणि या खेडेगावाला मोठ्या यात्रेचे स्वरूप आले होते. या विहिरीत हिरवेगार पाणी होते आणि झाडांची पाने या पाण्यात कुजलेली होती. झाडातील औषधी गुणधर्म या पाण्यात उतरले असल्याने ते पाणी औषधी बनले असावे असा अंदाज व्यक्त होत होता. दूरदूरहुन लोक बैलगाड्या भरून येथे येत होते पण हे पाणी गुणकारी नसल्याचे लक्षात येऊ लागले आणि लोकांची गर्दी आपोआप कमी होते गेली. त्यानंतर आज विज्ञानाने एवढी प्रगती केलेली असतानाही अशा घटना समोर येत आहेत हे आश्चर्यकारक आहे. वाचा >> कोरोनाने होणार ८० हजार लोकांचा मृत्यू !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !