पंढरपूर : सोलापूर जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असले तरी पंढरपूर आणि बार्शी तालुके सर्वात पुढे असून अजूनही या दोन तालुक्यातील रुग्णवाढ सोलापूर जिल्हा ग्रामीणच्या तुलनेत सर्वाधिकच आहे.
देश आणि राज्यभरात सगळीकडेच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेने झोप उडवली आहे. मोठ्या शहरापासून ग्रामीण भागापर्यंत कोरोनाची व्याप्ती आता भलतीच वाढू लागली असून सोलापूर जिल्हयांतही नव्या कोरोना रुग्णांची वाढ होत असून जिल्ह्यात पंढरपूर आणि बार्शी तालुक्यात सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. पंढरपूर हे तीर्थक्षेत्र असल्यामुळे येथे दररोज हजारो भाविकांची ये जा असते आणि राज्याच्या विविध भागातून हे भाविक पंढरीत येत असतात. त्यामुळे कोरोनाचा प्रसार आणि संसर्ग अधिक होण्याचा धोका असतो. मागील दोन्ही लाटेत पंढरपूर तालुक्याचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. सोलापूर जिल्हा ग्रामीणमध्ये मागील दोन्ही लाटेत रुग्णसंख्येत आणि मृतांच्या संख्येतही पंढरपूर सर्वाधिक आहे त्यामुळे पंढरपूरसाठी नागरिक आणि प्रशासनाने अधिक खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे.
काल प्राप्त झालेल्या अहवालात सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पंढरपूर आणि बार्शी या तालुक्यात अधिक रुग्ण असून या दोन तालुक्यातील बाधितांची संख्याही सर्वाधिक आहे. गुरुवारी सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात ५६६ तर सोलापूर शहरात २१८ नवे रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सोलापूर शहर आणि जिल्हा ग्रामीण मिळून २४ तासात ६८४ नव्या रुग्णांची भर पडली आहे. हा आलेख चढता आहे. जिल्हा ग्रामीण मध्ये रुग्णसंख्या मोठी दिसत असली तरी यातील अर्धीअधिक रुग्णसंख्या पंढरपूर आणि बार्शी तालुक्यातीलच आहे. ग्रामीण भागात काल आढळलेल्या ५६६ रुग्णात पंढरपूर १२६ आणि बार्शी तालुका ११६ अशा २४२ रुग्णांचा समावेश आहे. उरलेले रुग्ण अन्य सर्व तालुक्यातील मिळून आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !