बारामती : ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉलीला धडकल्याने एकाच कुटुंबातील तिघांचा एकाचवेळी शेवट झाला असून एक महिला गंभीर जखमी आहे. ऊसाच्या वाहतुकीचे आणखी तीन बळी गेल्याही ही दुर्दैवी घटना काळ मंगळवारी रात्री घडली आहे.
ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर आणि अपघात हे समीकरण होऊन गेले असून या अपघातात ठार झालेले सराफ व्यावसायिक कुटुंब आहे. उसाच्या ट्रॉलीला पाठीमागून जोराची धडक दिली गेल्याने हा अपघात झाला आणि या अपघातात बारामती येथील सराफ व्यावसायिक श्रेणिक भंडारी यांची पत्नी अश्विनी भंडारी, मुलगा मिलिंद भंडारी आणि बहीण सौ. कविता कळसकर हे तिघे ठार झाले आहेत. कविता कळसकर या बारामती येथील व्यापारी उदय कळसकर यांच्या पत्नी आहेत. रात्री दहा वाजण्याच्या सुमारास तरडोलीच्या जवळ हा अपघात झाला आहे. सदर अपघातात आणखी एक महिला गंभीर जखमी असून त्यांना उपचारासाठी पुण्याला हलविण्यात आले आहे.
बारामती येथील सराफ व्यावसायिकाचे कुटुंब एका धार्मिक कार्यक्रमासाठी पुणे येथे गेलेले होते. हा कार्यक्रम आटोपून रात्रीच बारामतीकडे येताना तरडोली जवळ हा दुर्दैवी अपघात झाला. समोरच्या ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉलीचा अंदाज न आल्याने भंडारी यांची गाडी मागच्या बाजूने थेट उसाच्या ट्रॉलीवर आदळली आणि हा अपघात झाला. या अपघातात तिघांचाही मृत्यू झाला असून घटनेची माहिती मिळताच बारामती येथून अनेकजण घटनास्थळी पोहोचले. मिलिंद भंडारी हे शांत स्वभावाचे आणि संयमी होते तर आश्विनी भंडारी आणि कविता कळसकर या धार्मिक स्वभावाच्या म्हणून परिचित होत्या. एका अपघाताने या दोन्ही कुटुंबावर शोककळा पसरली असून बारामतीत देखील या घटनेमुळे शोक व्यक्त केला जात आहे. भरधाव वेगाने निघालेली गाडी ट्रॉलीवर आदळल्याने अपघाताची तीव्रता अधिक होती आणि गाडीचा तर अक्षरश: चुराडा झाला आहे. या घटनेने बारामती परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !