मुंबई : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना अधिक धोका असल्याचे सांगितले जात होते परंतु प्रत्यक्षात जेष्ठ नागरिकांनाच जास्त धोका असल्याची आकडेवारी समोर आली आहे.
कोरोनाच्या पहिल्या लाटेत जेष्ठ नागरिकांना अधिक धोका झाला होता आणि कोरोनामुळे मृत्यू झालेल्यात जेष्ठ नागरिकांची संख्या सर्वाधिक होती. त्यानंतर आलेल्या दुसऱ्या लाटेत वृद्धासह तरुणांचा बळी गेला होता आणि आता तिसऱ्या लाटेत लहान मुलांना अधिक धोका असल्याचे तज्ञ आणि अभ्यासक यांच्याकडून सांगण्यात येत होते. लहान मुलांना होणारा संभाव्य धोका लक्षात घेऊन पंधरा ते अठरा वर्षे वयोगटातील मुलांचे लसीकरण करण्याची प्रक्रिया सुरु झाली आणि मोठ्या प्रमाणात हे लसीकरण करण्यात आले. अजूनही या वयोगटातील मुलांना लस देण्याची मोहीम वेगाने सुरु ठेवण्यात आली आहे. प्रत्यक्षात मात्र तिसऱ्या लाटेचा धोका हा जेष्ठ नागरिकांनाच होत असल्याचे समोर येऊ लागले आहे. त्यामुळे जेष्ठ नागरिकांनी अत्यंत दक्षता बाळगण्याची गरज निर्माण झाली आहे.
मुंबईत १ ते १६ जानेवारीच्या दरम्यान झालेल्या कोरोना मृत्यूत ८९ टक्के लोक ६० वर्षापेक्षा अधिक वयाचे होते. ४० ते ६० दरम्यान वय असलेल्या रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण ११ टक्के एवढे आहे. १६ दिवसात शहरात ८० नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झला आहे आणि यात ७१ जेष्ठ नागरिक होते तर उरलेले ४० ते ६० या वयातील होते. या मृत्युतील बहुतेक नागरिकांना श्वसनासंबंधित आजारांचा त्रास होता. मुंबई पालिकेने केलेल्या मृत्युच्या विश्लेषणातून काही निष्कर्ष समोर आले आहेत. जेष्ठ नागरिक हाच अतिजोखमीचा गट आहे शिवाय कोरोनाची सुरुवात झाल्यापासून शहरात झालेल्या मृत्यूंपैकी बहुतेक रुग्णांना काही ना काही अन्य व्याधी होत्या किंवा त्यांना उपचार घेण्यास विलंब झाला होता.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !