BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१८ जाने, २०२२

अपघातात पंढरपूर तालुक्यातील शेतकरी मृत्युमुखी !

 


पंढरपूर : थंडीच्या कडाक्यात देखील आपल्या शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी निघालेल्या शेतकऱ्याला दुचाकीने धडक दिल्याने  मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे.


पंढरपूर परिसरातील सगळेच रस्ते रुंद आणि सिमेंटचे बनले आहेत त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक अगदीच सुसाट सुटली आहे, लहान मोठी सगळीच वाहने प्रचंड वेगाने धावत असतात आणि सतत अपघात होत असतात.  सोयीसाठी आणि सुलभ दळण वळणासाठी नव्याने केलेले रस्ते हे मृत्यूचे महामार्ग बनू लागले आहेत. पंढरपूर- सांगोला हा रस्ता तर केवळ अपघात होण्यासाठीच बांधला आहे की काय असा प्रश्न पडावा एवढे अपघात या रस्त्यावर होत आहेत आणि मृत्यूचे प्रमाण देखील या मार्गावर अधिक आहे. पंढरपूर -शेटफळ मार्गावरही अधून मधून अपघात सुरूच आहेत. भल्या सकाळी झालेल्या अपघातात एका शेतकऱ्याला आपला जीव गमवावा लागला आहे. 


पंढरपूर तालुक्यातील बाभूळगाव येथील पांडुरंग बळीराम शिंदे हे ६२ वर्षे वयाचे शेतकरी दुचाकीने दिलेल्या धडकेत मृत्युमुखी पडले आहेत. शिंदे हे भल्या पहाटेच आपल्या शेताकडे निघाले होते. पिकांना पाणी देण्यासाठी ते लवकर उठून आपल्या शेताकडे पायी जात असताना पाठीमागून भरधाव आलेल्या दुचाकीने त्यांना उडवले. पंढपूर- बाभूळगाव मार्गावर पाहते साडे पाच वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. थंडीचे दिवस आणि पहाटेची वेळ असल्यामुळे या रस्त्याच्या आसपास कुणीही नव्हते. मयत पांडुरंग शिंदे यांच्या मागून त्यांचे चुलत बंधू चंद्रकांत महादेव शिंदे हे देखील आपल्या शेतात निघाले होते. ते पाठीमागून येत असल्याने त्यांनी पांडुरंग शिंदे यांचा अपघात झाल्याचे पहिले . तातडीने त्यांनी अन्य नातेवाईकांना या घटनेची माहिती दिली. 


अपघाताची माहिती मिळताच कुटुंबीय घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पांडुरंग शिंदे यांना पंढरपूर येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. पांडुरंग शिंदे यांच्या डोक्याला जबर मार लागला होता. घाई करून त्यांना पंढरपूर उप जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले परंतु त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. या अपघात प्रकरणी सत्यवान बळीराम शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात दुचाकीस्वार योगेश महादेव सुर्वे (आष्टी, ता. मोहोळ) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.       

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !