BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२८ डिसें, २०२२

पोलीसदादाने जेवणाची मागितली लाच आणि जाऊन बसला गजाआड !



शोध न्यूज : लाखोंची लाच घेताना पकडण्याची प्रकरणे समोर येत असताना एका पोलीस दादाने हजारो रुपयांसह जेवणाची लाच मागितली आणि तुरुंगात जाऊन बसला !


लाचखोरीची अनेक प्रकरणे समोर येत असताना त्यातील काही प्रकरणे ही प्रचंड धक्कादायक असतात. लाचेची रक्कम ऐकून देखील धडकी भरते. नुकतेच सोलापूर जिल्ह्यात शिपायाने एका शिक्षिकेला तब्बल पाच लाखांची लाच मागितल्याचे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे तोच एका पोलीस दादाला फुकटच्या जेवणाचा मोह भलताच महागात पडला. भरमसाठ पगार घेत असतानाही चिरीमिरीचा मोह लोकसेवकाला अनावर होतोच पण लाच घेवूनही वर जेवण देखील फुकट हवे असलेला एक पोलीस कर्मचारी लाचप्रकरणात चांगलाच अडकल्याची एक घटना प्रकाशात आली आहे. एक गुन्ह्यात मदत करण्यासाठी बिडकीन पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्याने लाच तर स्वीकारलीच परंतु जेवणासाठी फोन पे वरून दीड हजाराची रक्कम वेगळी घेतली. 


तक्रारदाराच्या विरोधात औरंगाबादच्या बिडकीन पोलीस ठाण्यात विनयभंगाचा एक गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात फिर्यादीची समजूत काढतो आणि गुन्ह्यात मदत करतो म्हणून विजय पवार या पोलिसाने ८० हजार रुपयांची लाच मागितली. यात तडजोड झाली आणि ५० हजार रुपयात सौदा पक्का झाला. त्यानंतर जेवणासाठी म्हणून त्याने वेगळे दोन हजार मागितले. त्यातही तडजोड झाली आणि जेवणासाठी दीड हजार रुपये देण्याचे ठरले. विशेष म्हणजे जेवणासाठीची ही रक्कम त्याने फोन पे च्या माध्यमातून स्वीकारली. यात तडजोड करण्यासाठी डोंगरूनाईक तांडा गावाचा पोलीस पाटील गुलाब छगन चव्हाण याने मध्यस्थाची भूमिका निभावली आणि पोलीस पाटील देखील गोत्यात आला. 


लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पोलीस कर्मचारी विजय पवार आणि पोलीस पाटील गुलाब चव्हाण या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करून या दोघानाही अटक केली आहे. फोन पे वरून जेवणासाठी घेतलेली रक्कम पोलिसाच्या खात्यावर जमा झाली त्यामुळे हा आयताच आणि मोठा पुरावा उपलब्ध झाला आहे. शिवाय त्याने पंचांच्या समक्ष ८० हजार लाचेची मागणी केली होती. या प्रकरणात पोलीस कर्मचारी तर अडकलाच पण मध्यस्थी करणारा पोलीस पाटील देखील गोत्यात आला आहे. (The police took a bribe for food! Police Patil is also in trouble) रकमेची तडजोड करूनही वर जेवणासाठी म्हणून पैसे घेतल्याची मोठी चर्चा रंगू लागली असून पोलीसदादा किती आणि काय काय खाणार ? असा सवाल देखील उपस्थित केला गेला आहे.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !