शोध न्यूज : महावितरणच्या एका कनिष्ठ अधिकाऱ्याने आपल्याच दोन वरिष्ठ अधिकाऱ्याना जबर 'शॉक' दिला असून अधीक्षक अभियंता आणि कार्यकारी अभियंता दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या हातात त्याने बेड्या ठोकल्याची वेगळी घटना घडली आहे.
शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यात लाचखोरीचे प्रमाण भलतेच वाढले असून सामान्य जनतेला शासकीय कामासाठी वेठीस धरले जाते. सामान्य कामासाठी देखील लोकसेवक लाचेची मागणी करतात. साहेबापासून शिपायापर्यंत सर्रास लोकसेवक लाचेला चटावलेले आहेत. गलेलठ्ठ पगार मिळत असतनाही चिरीमिरीसाठी अधिकारी, कर्मचारी लाचार होताना दिसतात. जनतेच्या कामासाठी तर लाचखोरी होतच असते परंतु आपल्याच सहकारी अधिकारी, कर्मचारी बांधवाच्या कामासाठी देखील लाचेची अपेक्षा केली जाते. शासकीय कार्यालयात असे प्रकार घडताना नेहमीच दिसतात. एका कनिष्ठ अधिकाऱ्याने मात्र अशा लाचखोर आणि वरिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्यांना जबर शॉक दिला असून त्यांना थेट तुरुंगातच जाण्याची वेळ आली आहे. या घटनेची राज्यभर चर्चा होऊ लागली आहे.
लाचखोरीत महसूल, पोलीस हे विभाग नेहमी चर्चेला असले तरी अन्य विभागही काही मागे नाहीत. महावितरण विभागात देखील अशा घटनात वाढ होताना दिसत आहे. जनतेच्या किरकोळ कामासाठीही लाचखोर अडवणूक करतात पण आपल्याच खात्यातील अधिकाऱ्यालाही अशीच वागणूक दिली जात असताना त्याने वरिष्ठांना चांगलाच हिसका दाखवला आहे. महावितरणच्या कनिष्ठ अधिकाऱ्यालाच अधीक्षक अभियंता आणि कार्यकारी अभियंता अशा दर्जाच्या दोन अधिकाऱ्यांनी लाचेची मागणी केली आणि मग कनिष्ठ महावितरण अधिकाऱ्याने या दोघांनाही जबर शॉक दिला. एका कनिष्ठ अधिकाऱ्यावर दोन तीन तक्रारी महावितरणकडे आलेल्या होत्या. या तक्रारीवर कसलीही कारवाई न करण्यासाठी महावितरण विभागाच्या अधीक्षक अभियंता किरण हरीश नागावकर व कार्यकारी अभियंता प्रताप मचिये या दोघाने त्या अधिकाऱ्याकडे दोन लाख लाचेची मागणी केली. ही रक्कम जास्त होत असल्याचे सांगून तडजोड होऊन ही रक्कम दीड लाखावर अंतिम झाली.
कनिष्ठ अधिकाऱ्याने दीड लाख रुपये देण्याचे मान्य करून थेट पालघर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे कार्यालय गाठले. महावितरण विभागाच्या अधीक्षक अभियंता किरण हरीश नागावकर व कार्यकारी अभियंता प्रताप मचिये या दोन्ही अधिकाऱ्यांच्या विरोधात तक्रार दिली. एसीबीच्या पथकाने लगेच या तक्रारीची आपल्या पद्धतीने पडताळणी केली आणि पडताळणीत लाच मागितली असल्याचे सिद्ध होताच या विभागाने सापळा लावला. महावितरणच्या कार्यालयातच सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास हा सापळा लावण्यात आला. तडजोड होऊन दीड लाखाच्या रकमेपैकी एक लाखाची रक्कम घेताना या मोठ्या माशांना एसीबी पथकाने जाळ्यात पकडले. महावितरणचे दोन अधिकारी सापळ्यात रंगेहात अडकताच महावितरण विभागात प्रचंड खळबळ उडाली.
महावितरणच्या दोन्ही बड्या अधिकाऱ्याना रंगेहात पकडून त्यांना अटक करण्यात आली आणि त्यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली. वरिष्ठ दर्जाच्या दोन अधिकाऱ्याना लाचखोरीत पकडल्याने महावितरणच्या राज्यभरातील कार्यालयात ही बातमी धडकली आणि राज्यभर या लाचखोर अधिकाऱ्यांची चर्चा सुरु झाली आहे. (Junior officers gave two senior officers a 'shock') कर्मचारी वर्गात देखील खळबळ असून इतरांनीही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा मोठा धसका घेतला आहे. कनिष्ठ अधिकाऱ्याने आपल्याच वरिष्ठ अधिकाऱ्याला दिलेला हो जबर शॉक अनेकांची झोप उडवणारा ठरला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !