BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

३ फेब्रु, २०२४

बायकोने अडकवले पण वकीलांच्या युक्तीने सोडवले !



शोध न्यूज : पंढरपूर तालुक्यातील बहुचर्चित ठरलेल्या एक घटनेत पत्नीने पतीविरुद्ध अशी काही तक्रार केली की त्याची सगळीकडे चर्चा झाली, मात्र वकिलांनी केलेल्या युक्तिवादाने पतीला न्यायालयाने जामीन मंजूर केला आणि  पुन्हा या घटनेची चर्चा सुरु झाली आहे.


पत्नीने आपल्या पतीच्या विरोधात ॲट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल केल्याने हा विषय अधिक चर्चिला गेला होता. पती आणि पत्नीत ॲट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल होण्याची ही बहुधा पहिलीच वेळ असावी त्यामुळे अनेकांचे लक्ष या प्रकरणाकडे वेधले गेले होते.  प्रेमविवाह केलेल्या दलित समाजातील बायकोने, सवर्ण नवऱ्याविरुद्ध ॲट्रॉसिटी कायद्याखाली दाखल केलेल्या फिर्यादीनुसार, पंढरपूर तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्यामुळे महाराष्ट्रात खळबळ माजली होती. दरम्यान, अटकेत असलेल्या  'त्या' नवऱ्याची  सत्र न्यायालयाने जामिनावर मुक्तता केली आहे. पीडित पत्नीने पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत असे कथन केले होते की, ती दलित समाजाची आहे आणि तिचा पती  सवर्ण समाजाचा आहे. त्यांचा प्रेमविवाह झाला होता. त्यांना दोन मुली झाल्या आहेत. परंतु नवरा, जातीवरून मला अपमानास्पद  बोलतो, शारीरिक व मानसिक त्रास देतो आणि माझ्यावर लैंगिक अत्याचार करतो. त्यानुसार पोलिसांनी अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह (ॲट्रॉसिटी ॲक्ट) भारतीय दंड संहिता कलमांन्वये गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर  पोलिसांनी अटक केली होती. 


पोलीस कोठडी संपल्यानंतर  आरोपी नवऱ्याने, महाराष्ट्रातील एक आघाडीचे ज्येष्ठ फौजदारी वकील धनंजय माने यांच्यामार्फत न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. आरोपीचा फिर्यादीबरोबर प्रेमविवाह झाला आहे, आरोपीने पत्नीला तिच्या  जातीसह स्वीकारलेले आहे. त्यामुळे आरोपीने तिचा जातीवरून अपमान करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. यावरून तो अस्पृश्यता पाळतच नाही, हे सिद्ध होते, त्यामुळे ॲट्रॉसिटी ॲक्टमधील ३(१) व ३(२) हे कलम लागूच शकत नाही. त्याचप्रमाणे अत्याचाराबाबत कोणताही ठोस आरोप नाही. विलंबाने दिलेल्या फिर्यादीवर विश्वास ठेवणेही धोक्याचे आहे, असा युक्तिवाद ॲड. धनंजय माने यांनी जामीन अर्जावरील सुनावणीप्रसंगी केला. न्यायाधीशांनी आरोपीची जामिनावर मुक्तता करताना त्याला पोलीस ठाण्यात हजेरी देण्याचे बंधन घातले आहे. या प्रकरणात आरोपीतर्फे ॲड. धनंजय माने , ॲड. जयदीप माने, ॲड. सिद्धेश्वर खंडागळे, ॲड. सुहास कदम, ॲड. वैभव सुतार यांनी काम पाहिले.


सदर प्रकरण हे तसे दुर्मिळ असल्याने याची चर्चा महाराष्ट्रभर झाली होती, विशेषत: पंढरपूर तालुका आणि  सोलापूर जिल्ह्यात ही बहुचर्चित घटना ठरली होती. पत्नीकडून विविध प्रकारच्या तक्रारी पोलीस ठाण्यात दाखल होत असतात पण पत्नीने थेट ॲट्रॉसिटी कायद्याचा वापर पतीच्या विरोधात केला आहे. (Wife's Complaint, Husband's Bail, Advocates' Skills) मुळात हा गुन्हा पोलिसांनी तरी कसा दाखल करून घेतला ? याचेही आश्चर्य व्यक्त होत असतानाच आता न्यायालयाने पतीला जामीन मंजूर केल्याने पुन्हा एकदा हा विषय चर्चेला आला आहे. वकिलांनी केला नेमका युक्तिवाद सद्या तरी पतीला फायदेशीर ठरला आहे.

पहा, काय म्हणताहेत, जेष्ठ विधिज्ञ एड. धनंजय माने ===

 




अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा !  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !