शोध न्यूज : तुरीच्या शेंगा खायला कुणालाही आवडतात पण हाच तुरीचा चवदार दाणा एका चिमुकल्याच्या जीवावर बेतला असून, तुरीच्या या एका दाण्याने तिचा जीव घेतला आहे. या घटनेने पालकांचे डोळे पुन्हा एकदा खाडकन उघडले आहेत.
हल्ली प्रत्येक आईबाप आपल्या कामात व्यस्त असतो, लहान मुलांना सांभाळायला अथवा त्यांच्याकडे लक्ष द्यायला फारसा वेळ कुणाकडे नसतो. त्यामुळे ते बालकांच्या हाती मोबाईल देवून त्यांना गप्प करतात किंवा काही वस्तू खेळण्यासाठी देतात. खेळण्यासाठी दिलेल्या वस्तू लहान मुले तोंडात घालतात आणि याच वस्तू त्यांच्या घशात अडकतात. कित्येकदा तर जीवघेण्या वस्तू त्याच्या पोटात पोहोचतात आणि मग या लहान मुलाचा जीवन मृत्यूशी खेळ सुरु होतो. अनेकदा डॉक्टर अशा मुलांना वाचवतात पण, काही प्रसंगी मुलांच्या जीवाला देखील धोका होत असतो. कुणाच्या कल्पनेत देखील येणार नाही अशी एक घटना अकोला जिल्ह्यातून समोर आली असून, या घटनेबाबत ऐकून देखील अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला आहे. लहान मुलांकडे थोडेसे दुर्लक्ष झाले तरी केवढे संकट समोर उभे राहते याचेच हे अत्यंत मोठे उदाहरण आहे.
अकोट तालुक्यातील पाटसुल या गावातील ही घटना अत्यंत चक्रावणारी आणि विचार करायला लावणारी आहे. तीन वर्षे वयाच्या योगीराज अमोल इसापुरे या चिमुकल्याचा हा मृत्यू धक्कादायक ठरला आहे. योगीराज आपल्या आजीसोबत घरी असताना, त्याची आजी तुरीच्या शेंगातून दाणे काढत होती. योगीराज हा खेळत खेळत आपल्या आजीजवळ गेला आणि आजीने सोललेले तुरीचे दाणे त्यांने आपल्या तोंडात कोंबले. योगीराज हा तुरीचे दाणे खात आहे असे आजीला वाटले त्यामुळे तिला याचे काहीच गांभीर्य वाटले नाही. योगीराजने तुरीचे दाणे तोंडात कोंबले खरे पण त्यातील एक दाणा त्याच्या नाकात गेला. तेथून तो श्वास नलिकेत गेला आणि त्याला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. यामुळे आजी घाबरून गेली आणि दरम्यान त्याची प्रकृती देखील बिघडू लागली. शेजारी देखील मदतीला धावून आले. योगीराजची अवस्था पाहून त्याला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले पण रुग्णालयात पोहोचण्याआधीच त्याचा मृत्यू झाला.
या अकल्पित आणि अनपेक्षित घटनेने योगीराजचे कुटुंब पुरते उध्वस्त झाले तर गावात देखील मोठ्या प्रमाणात हळहळ व्यक्त होऊ लागली आहे. लहान मुलाकंडे थोडेसे जरी दुर्लक्ष झाले तरी काय घडू शकते याचा अनुभव गावकरी घेत होते. या घटनेनंतर पोलिसांनी गावात जाऊन जनजागृती केली. लहान मुलांकडे लक्ष ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले. (A single grain of turmeric took the child's life) लहान मुलांकडे नीट लक्ष द्यायला हवे, ते कोणतीही गोष्ट तोंडात टाकत नाहीत ना, हे तपासा, असे आवाहन या घटनेनंतर करण्यात येत आहे. घटना घडून गेल्यावर केवळ पश्चाताप उरतो त्यामुळे काही घडण्याआधीच काळजी घेणे हे केंव्हाही श्रेयस्कर असते. अनेक घटना घडूनही कित्येक पालक सावध होत नसल्याचे चित्र नेहमी समोर येते. योगीराजच्या घटनेने मात्र पालकवर्गात चिंतेचे वातावरण निर्माण केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !