BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२९ डिसें, २०२१

पंढरपूरच्या वेशीवर रानगवा, सांगोला तालुक्यात झाले दर्शन !

 



पंढरपूर : पंढरपूर तालुक्यात बिबट्याची दहशत असतानाच आता रानगवा पंढरपूर तालुक्याच्या वेशीवर आला असून सांगोला तालुक्यात या गव्याचे दर्शन होऊ लागले आहे. 

पंढरपूर तालुक्यातील शेतकरी आणि गावकरी बिबट्याच्या दहशतीखाली वावरत आहेत, वाखरी, कोर्टी, गादेगाव, कुरोली या परिसरात बिबट्या असल्याचे आणि तो कुणाला तरी दिसल्याचे सांगितले जाते. पाळीव प्राण्यावर हल्ला करण्याच्या काही घटनाही समोर आल्या आहेत. पंढरपूर तालुक्यात बिबट्या असल्याचा एक व्हिडीओ काही दिवसांपूर्वी समाज माध्यमावर फिरत होता परंतु वन विभागाने अद्यापही याबाबत काही ठोस सांगितले नाही त्यामुळे जनतेच्या मनावर असलेले दडपण तसेच राहिले आहे.  

राज्यात अनेक ठिकाणी बिबट्या दर्शनाच्या चर्चा पुढे आल्या आणि आता रानगव्याची भीती निर्माण झाली आहे. सांगली येथे रानगव्यामुळे बराच गोंधळ उडाला आहे आणि त्यानंतर आता सांगोला तालुक्यात गव्याचे दर्शन होत असल्याचे सांगितले जात आहे. सांगोला तालुक्यातील आलेगाव येथील हजारे वस्ती जवळ असलेल्या वन विभागाच्या कार्यक्षेत्रात गेल्या तीन दिवसांपासून एका गव्याचे दर्शन होत आहे. हा रानगवा या परिसरात फिरताना दिसत आहे. त्याला स्थानिक जनावरे, अन्य प्राणी अथवा माणसांचे दर्शन झाल्यास तो इकडून तिकडे धावत सुटल्याचे काही जणांनी पहिले असल्याचे सांगितले जात आहे. या रानगव्याने कोणालाही काही इजा केली नसून पिकांचे मात्र नुकसान होत असल्याचे शेतकरी सांगू लागले आहेत. 

अचानक हा रानगवा कोठून आला याची काहीच माहिती मिळत नाही तथापि सांगली येथून चुकून हा गवा सांगोला तालुक्यापर्यंत पोहोचला असावा असा कयास लावला जात आहे. गव्याने धुमाकूळ घातल्याने सांगली मार्केट यार्द परिसरात १४४ कलम लागू करावे लागले होते. सांगली शहरात नागरिकांचीही मोठी तारांबळ उडाली. आता सांगोला तालुक्यात गव्याचे दर्शन होत असून काही दिवसांपूर्वी कमलापूर, वासूद, कडलास, डिकसळ आदी भागात त्याचा वावर दिसून आला होता.

आणखी वाचा >>>

 

  


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !