पंढरपूर : मोठ्या भावाला न्यायालयाने ठोठावलेली शिक्षा रद्द व्हावी अशी इच्छा असलेल्या लहान भावाचा मृत्यू झाल्यानंतर त्याची ही इच्छा न्यायालयात पूर्णत्वास आल्याची अत्यंत दुर्मिळ घटना घडली आहे.
माणसांची शेवटची इच्छा अत्यंत महत्वाची मानली जाते आणि ती पूर्ण करण्यासाठी नातेवाईक धडपड करीत असतात. फाशीची शिक्षा झालेल्या गुन्हेगाराला देखील त्याची अंतिम इच्छा विचारली जाते आणि ती पूर्ण केली जाते. पण कुणाची इच्छा न्यायालयातून पूर्ण करण्याचा प्रसंग कधी येत नाही. मयत झालेल्या व्यक्तीची इच्छा मात्र न्यायालयात पूर्ण झाल्याची दुर्मिळ घटना सोलापूर जिल्ह्यात घडली आहे. पंढरपूर तालुक्यातील खेड भोसे येथील पवार बंधू यांच्यातील वादाची ही अनोखी घटना आहे. खेड भोसे येथील नवनाथ बापू पवार आणि त्यांचे बंधू विनायक बापू पवार यांच्यात शेताच्या बांधावरून १९९८ पासून वाद होता. या वादातून पुढे त्यांच्यात जोराची भांडणेही झाली. २८ ऑक्टोबर २००८ रोजी नवनाथ पवार आणि त्यांच्या कुटुंबीयांनी बंधू विनायक पवार यांच्यावर सशस्त्र हल्ला केला होता. या हल्ल्यात विनायक जखमी झाले होते. या घटनेबाबतची फिर्याद विनायक यांच्या पत्नी मालन यांनी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात दिली आणि त्यानुसार गुन्हा दाखल झाला होता.
या खटल्याची पंढरपूर न्यायालयात सुनावणी झाली आणि नवनाथ पवार, त्यांची पत्नी सिंधू पवार, मुलगा तानाजी आणि नितीन यांना न्यायालयाने दोषी धरून एक महिना कारावासाची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेविरुद्ध नवनाथ पवार यांनी अपील दाखल केले होते. मोठ्या भावाला झालेली शिक्षा विनायक पवार यांना अस्वस्थ करीत होती. त्यांना याचे खूप वाईट देखील वाटत होते. अखेर त्यांनी या प्रकरणात तडजोड करण्याचे ठरवले. प्रकरण संपविण्याची प्रबळ इच्छा असतानाच नवनाथ पवार यांचा १ जुलै २०२१ रोजी निधन झाले आणि त्यांची अखेरची इच्छा तशीच राहून गेली. नवनाथ यांची ही इच्छा पूर्ण करण्याचा निर्णय त्यांच्या कुटुंबीयांनी घेतला पण हे सर्व प्रकरण न्यायालयाच्या अधीन होते. कुटुंबाची कितीही इच्छा असली तरी त्यांच्या हातात काहीच नव्हते. त्यांनी न्यायालयात तडजोडीसाठी अर्ज सदर केला पण जखमी विनायक यांचा मृत्यू झालेला असल्याने अशी तडजोड करता येईल काय ? हा कायदेशीर पेच निर्माण झालेला होता.
अर्जदाराचे वकील ऍड धनंजय माने यांनी मात्र न्यायालयाच्या निदर्शनास महत्वाची बाब आणून दिली. फौजदारी दंड संहिता ३२० (४) (ब) नुसार मयताचे वारस मयताच्या वतीने असा तडजोडीचा अर्ज न्यायालयात दाखल करू शकतात हे निदर्शनास आणून दिले. न्यायालयाने ही बाब मान्य केली आणि तडजोडीचा अर्ज मान्य करीत नवनाथ पवार आणि त्यांच्या कुटुंबियांना सुनावण्यात आलेली शिक्षा रद्द केली. लहान भावाची अखेरची इच्छा त्यांच्या मृत्यूनंतर न्यायालयात पूर्ण झाली. या खटल्यात आरोपीच्या वतीने ऍड. धनंजय माने, ऍड. जयदीप माने, ऍड. सिद्धेश्वर खंडागळे, ऍड. विकास मोटे यांनी तर फिर्यादीच्या वतीने ऍड. एम एस मिसळ, ऍड. सुहास कदम यांनी काम पहिले.
मयत व्यक्तीच्या वतीने तिच्या कुटुंबीयांनी फौजदारी खटल्यात अपिलात तडजोड करण्याची ही पहिलीच घटना असल्याचे मानले जात आहे. जवळपास २३ वर्षांपासून दोन भावामध्ये सुरु असलेला वाद संपविण्याची इच्छा असतानाच एका भावाचा मृत्यू झाला. वाद संपुष्टात आणण्याची तयारी असतानाही भावाचा मृत्यू झाल्याने त्यांना आपल्या हयातीत हा वाद संपविता आला नाही पण त्यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांची इच्छा मृत्यूनंतर न्यायालयीन प्रक्रिया करून पूर्ण केली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !