सांगोला : टिप्परने समोरून दिलेल्या जोरदार धडकेमुळे पंढरपूर तालुक्यातील एक जण जागीच ठार झाला असून दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. सांगोला तालुक्यातील जुनोनी - कोळे रस्त्यावर हा अपघात झाला आहे.
अलीकडे अपघाताचे प्रमाण भलतेच वाढले असून सांगोला तालुक्यात पुन्हा एक अपघात झाला. दुचाकीवरून (एम एच १३ क्यू ०६६१) तिघेजण रात्रीच्या वेळेस प्रवास करीत असताना जुनोनी - कोळे रस्त्यावर आलदर पेट्रोल पंपाच्या समोरच्या बाजूस हा अपघात झाला. समोरून येणाऱ्या एका टिप्परने या दुचाकीला जोराची धडक देताच दुचाकी टिप्परच्या समोरच आडवी पडली. यावेळी दुचाकीवरील तिघेही रस्त्यावर पडले आणि यातील एक जण जागीच ठार झाला तर दोघे जण जखमी झाले आहेत. दुचाकी चालवत असलेला पंढरपूर येथील श्रीमंत अर्जुन जाधव हा जागीच मृत्युमुखी पडला तर सोनके येथील सुरेश मल्हारी महानवर आणि आटपाडी तालुक्यातील करगणी येथील रघुनाथ पांडुरंग माडकर हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत.
अपघातात ठार झालेला जाधव आणि त्याचे दोन साथीदार हे आटपाडी तालुक्यातील खरसुंडी येथे रंगाचे काम करण्यासाठी गेले होते. तेथील काम संपवून परत येत असताना हा अपघात घडला. खरसुंडी येथील काम संपल्यामुळे काल ते तिघे मिळून दुचाकीवरून जुनोनी येथे आले होते. नव्या कामाचा शोध ते घेत होते आणि यासाठीच ते जुनोनी येथे आले होते. काल रात्री जुनोनी येथील नवे काम पाहून रात्रीच दुचाकीवरून खरसुंडी येथे निघाले होते. जुनोनी येथून कोळे मार्गे खरसुंडीकडे परत जात असता मध्यरात्रीच्या सुमारास ही दुर्घटना घडली. जुनोनी - कोळे रस्त्यावर असतानाचा आलदर पेट्रोल पंपाच्या समोरच्या बाजूस एका टिप्परने त्यांना समोरून जोराची धडक दिली. पिवळ्या रंगाचा हा टिप्पर अपघात करून पसार झाला.
दुचाकीला समोरून जोराची धडक बसल्याने पंढरपूर येथील दुचाकी चालक श्रीमंत अर्जुन जाधव याच्या डोक्याला, कपाळाला जोरदार मार लागला. यात ते जागीच ठार झाले. पंढरपूर तालुक्यातील सोनके येथील सुरेश महारनवर हा देखील खाली पडून त्याच्या हाताला मार लागला, त्याच्या हाताची तीन बोटे तुटली असून त्याच्या पायाही जबर मार लागला आहे. त्याचा साथीदार रघुनाथ माडकर याच्या पाठीला जोरदार मार लागला आहे. सदर अपघाताबाबत सांगोला पोलिसात फिर्याद दाखल करण्यात आली असून पोलिसांनी अज्ञात टिप्पर चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
आणखी वाचा >>>
- सोलापूर ग्रामीणच्या आणखी एका पोलिसाला बेड्या !
- पंढरपूर तालुक्यातील भावंडाची हृदयद्रावक कहाणी ! मृत्युनंतर इच्छा पूर्ण !
- पंढरपूरच्या वेशीवर आला रानगवा !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !