अमरावती : मरणापूर्वीच होतोय तेराव्याचा कार्यक्रम ! विश्वास नाही ना बसत ? पण हे सत्य आहे. एक सेवानिवृत्त पोलीस उप निरीक्षक करताहेत आपल्या डोळ्यादेखत आपलाच तेरावा.. त्यासाठी त्यांनी निमंत्रण पत्रिका छापून अनेकांना निमंत्रितही केले आहे.
माणसांच्या मृत्युनंतर वेगवेगळे विधी केले जातात त्यात तेरावा एक असतो. आपली अंत्ययात्रा जशी कुणालाच पाहायला मिळत नाही तसे आपल्याच तेराव्याच्या विधीला आपण कधीच हजर राहू शकत नाही. असे असले तरी अमरावती जिल्हातील एका निवृत्त पोलीस उपनिरीक्षकाने स्वतःच असा एक कार्यक्रम आयोजित केला आहे आणि त्यासाठी त्यानीं आपले मित्र, नातेवाईक यांना जेवणासाठी निमंत्रणही पाठवले आहे. कुणाला वाटेल हा कुठल्यातरी आंदोलनाचा भाग असेल तर कुणाला वाटेल, डोक्यावर परिणाम झाला असेल म्हणून असे केले असेल ! पण तसे नक्कीच नाही. त्यामागे त्यांची एक भावना आहे आणि ती जाणून घेतल्यावर नकळत डोळ्यांच्या कडा पाणावल्याशिवाय रहात नाहीत. .
पोलीस उपनिरीक्षक पदावर काम करणारे सुखदेव डबराले हे साडे पाच वर्षांपूर्वी बुलढाणा येथून निवृत्त झाले. त्यांनी आता आपल्याच तेराव्याच्या कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका छापली आहे आणि ते अनेकांना निमंत्रण देत आहेत. ३१ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजता आपल्या घरीच त्यांनी तेराव्याचा कार्यक्रम आयोजित केला आहे आणि त्यानिमित्त भोजनहे ठेवले आहे. अमरावती शहरात रहाटगाव येथे डबराले रहात आहेत. त्यांना एक मुलगाही असून तो मुंबईत बॉक्सिंग कोच आहे तर त्यांची मुलगी पोलीस उपनिरीक्षक म्हणून लवकरच रुजू होणार आहे. निवृत्त पोलीस उप निरीक्षक डबराले यांची प्रकृती उत्तम असून ते दररोज व्यायामही करतात. त्यांची मानसिक स्थिती व्यवस्थित आहे.
एवढं सगळं काही ठिकठाक असताना आपल्याच हयातीत आपलाच तेरावा कुणी घालेल काय ? असा प्रश्न कुणी विचारला तर तो स्वाभाविक आहे पण प्रत्येकाचे लॉजिक काही वेगळे असते, विचार वेगळे असतात आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोनही वेगवेगळा असतो. प्रचलित पद्धतीपेक्षा कुणी काही वेगळे करू लागले तर त्याची चर्चा तर होणारच ! डबराले यांचे हे नियोजन आणि कार्यक्रमाचे निमंत्रण पाहून अनेकांची अवस्था विचित्र होऊन बसली आहे. माणूस जिवंत असताना त्याचा तेरावा कसा ? आणि त्यांनी केला तरी अशा कार्यक्रमाला जायचे तरी कसे ? कुणाच्या जिवंतपणी त्याच्या तेराव्याचे भोजन करायचे तरी कसे ? असे अनेक प्रश्न उभे राहिले असले तरी ३१ डिसेंबर रोजी हा कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे आणि त्याची तयारीही सुरु आहे.
डबराले यांनी या कार्यक्रमाबाबत मोकळेपणे खुलासाही केला आहे. ते म्हणतात, " माणसांच्या जीवनाची शाश्वती नाही म्हणून हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, आपण सेवेतून निवृत्त होऊन साडे पाच वर्षे झाली आहेत. सेवानिवृत्त झालेले अनेकजण दीड दोन वर्षात अखेरचा श्वास घेतात. मी मात्र निवृत्ती वेतनाचा आनंद घेत आहे. आयुष्याचा पुरेपूर आनंद आपणा लुटलेला असून आता कुठल्याही क्षणी मृत्यू आला तर त्याचे आनंदाने स्वागत करण्याची आपली तयारी आहे. मरण कधीही येऊ शकते, त्यामुळे जुने मित्र, दुरावलेले नातेवाईक या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र यावेत अशी आपली इच्छा आहे. "
वाचा >> ब्रेक झाला फेल आणि ड्रायव्हर गेला पळून .. चिरडली माणसं !
निवृत्त पोलीस उप निरीक्षक सुखदेव डबराले यांनी जरी स्वतःच्या आनंदासाठी हा कार्यक्रम आयोजित केला असला तरी त्यांच्या कुटुंबियांना मात्र वेदना होणे स्वाभाविक आहे. त्यांच्या पत्नीही या कार्यक्रमाच्या आयोजनामुळे दुखावलेल्या आहेत तर पोलीस खात्यात असलेल्या त्यांच्या मोठ्या मुलीनेही विरोध दाखवला आहे. त्यांची लहान मुलगी आणि जावी यांनी मात्र या निर्णयाचे स्वागत केले आहे. ज्यांना ज्यांना त्यांनी निमंत्रित केले आहे त्यांची मात्र पंचाईत झाली आहे. या कार्यक्रमाला जावे की नको याचे उत्तर कुणालाच मिळताना दिसत नाही. अनेक प्रश्न असे असतात की त्याची उत्तरे कधीच मिळत नसतात, या कार्यक्रमाने तर ज्याचे त्याचे शब्द गोठून गेले आहेत !
पहा व्हिडीओ > धक्कादायक !पंधरा लाखापर्यंत भ्रष्टाचारास मान्यता !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !