पंढरपूर : नगरपरिषद नगराध्यक्षपदांचा कार्यकाळ संपल्याने शासनाने अशा नगरपरिषदांचा कारभार हा सरकारी अधिकाऱ्यांच्या हाती दिला असून प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे. यात सोलापूर जिल्ह्यातील ९ नगरपरिषदांचा समावेश आहे.
राज्यातील अनेक नगरपरिषदांचा नगराध्यक्षपदाचा कालावधी संपलेला असून काहींचा कालावधी येत्या काही दिवसात समाप्त होत आहे. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने निवडणुका घेणे शक्य झाले नाही तसेच येत्या काळात लवकर निवडणुका होणे शक्य दिसत नाही. त्यामुळे राज्यातील अनेक नगरपालिकावर प्रशासकांची नियुक्ती होणार हे स्पष्ट होते त्यानुसार शासनाच्या नगर विकास विभागाने एक आदेश पारित केला असून त्यानुसार मुदत संपलेल्या नगरपरिषदेत प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे. उप विभागीय अधिकारी, तहसीलदार, मुख्याधिकारी यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यात सोलापूर जिल्ह्यातील ९ नगरपरिषद / नगरपंचायतींचा समावेश आहे. पंढरपूर नगरपालिकेची मुदत उद्या २९ डिसेंबर रोजी संपत असून उप विभागीय अधिकारी यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
नगराध्यक्ष पदाचा कार्यकाळ संपला असल्याने यापुढे शहरांची गाडी सरकारी अधिकाऱ्यांच्या हातात गेली असून निवडणुका होऊन नवे नगराध्यक्ष पदावर आरूढ होईपर्यंत प्रशासक कारभार पाहणार आहेत. प्रशासकांच्या नियुक्तीमुळे आता लोकनियुक्त सदस्यांचा वावर कमी दिसणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !