पुणे : आयशर ट्रकचा ब्रेक फेल होताच ड्रायव्हर पळून गेला आणि ट्रक नागरिकांना चिरडत सुटल्याचा धक्कादायक थरार आज नवले पुलावर घडला. या अपघातात तीन ते चार जग जागीच ठार झाले आहेत तर कित्येकजण जखमीही झाले आहेत.
पुण्याच्या नवले पुलावर सतत आणि मोठे अपघात होत आहेत, अनेकांचे प्राण जात आहेत तर तितकेच जखमीही होत आहेत. नवले पूल हा आता मृत्यूचा पूल बनला असून आज पुन्हा एक वेगळाच थरार येथे पाहायला मिळाला आहे. नवले पुलाजवळील भूमकर ब्रिजवर सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास हा थरारक अपघात घडला आहे. मुंबईकडून साताऱ्याच्या दिशेने निघालेल्या आयशरचा ब्रेक अचानक फेल झाला त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले. उताराच्या दिशेने आयशर मागे सरकू लागल्याने तर चालकाला काय करावे हेच समजेनासे झाले. या परिस्थितीत चालक पूर्ण गोंधळून गेला. गाडी तर मागे मागे सरकत होती आणि चालकाच्या हाती काहीच उरलेले नव्हते. अखेर तशाच अवस्थेत गाडी सोडून चालकाने पळ काढला आणि ही बेवारस झालेली गाडी मागे सरकत राहिली.
कुणाचेही कसलेही नियंत्रण नसलेला हा आयशर उतारावरून मागे मागे जात रस्त्यावरील नागरिकांना चिरडत निघाला. यात तिघांचा चिरडून जागीच मृत्यू झाला आहे. पाठीमागील काही चार चाकी वाहनांनाही या आयशरने धडक दिली त्यात काही जण जखमी झाले आहेत. या अपघातात मृत्युमुखी पडलेले तिघे जण रोजंदारी कामावरील मजूर असल्याची प्राथमिक माहिती हाती येत आहे. या अपघातामुळे या परिसरात एकदम गदारोळ निर्माण झाला आणि लोक सैरावैरा झाले. पाठीमागून येणाऱ्या वाहनांचीही तारांबळ उडाली. वाहतुकीचीही कोंडी झाल्याने आणखी गोंधळ उडाला. हा थरार पाहणारेही काही काळ घाबरून गेले होते.
अपघाताची माहिती मिळताच सिंहगड वाहतूक विभाग आणि सिंहगड रस्ता पोलीस घटनास्थळी तातडीने दाखल झाले. नागरिकांनीही मोठी गर्दी केली होती आणि वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती. परिस्थिती सुरळीत करताना पोलिसांचीही दमछाक झाली होती. काही वेळेनंतर या मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली. या अपघाताने मात्र अनेकांच्या काळजाचा ठोका चुकवला होता.
वाचा : >> महिलेच्या पायाला लावला तरी विनयभंगाचा गुन्हा !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !