औरंगाबाद : एका गरीब शेतकऱ्याचा खात्यावर पंधरा लाखाची रक्कम जमा झाली आणि त्याने पंतप्रधान कार्यालयास मेल पाठवून आभार देखील मानले पण पुढे मात्र भलतेच घडले.
सन २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी नरेंद्र मोदी यांनी काळा पैसा भारतात आणण्याची घोषणा केली होती. भारतात आणलेल्या काळ्या पैशातून प्रत्येकाच्या खात्यावर पंधरा पंधरा लाख रुपये जमा करण्यात येथील असे देखील म्हटले होते. भारतातील जनतेला हे खरे वाटले पण अजून तरी हे पैसे कुणाच्या खात्यावर जमा झाले नाहीत. नंतर तर हा निवडणुकीचा जुमला होता असेही सांगितले गेले. विरोधक आजही या पंधरा लाखाच्या विषयावरून टीका करीत आहेत पण पंधरा लाख कुणाच्या खात्यावर जमा होताना दिसत नाहीत. पैठण तालुक्यातील दावरवाडी येथील ज्ञानेश्वर औटे या शेतकऱ्याच्या खात्यावर पंधरा लाखाची रक्कम जमा झाली आणि गरीब शेतकरी सुखावला.
या शेतकऱ्याच्या जनधन खात्यावर पंधरा लाख जमा झाले आणि त्याच्या आनंदाला पारावर उरला नाही. २०१४ साली दिलेले आश्वासन उशिराने का होईना पण पूर्ण झाले याचा त्याला कमालीचा आनंद झाला आणि त्याने पंतप्रधान कार्यालयास एक मेल पाठवून रक्कम मिळाल्याचे सांगत धन्यवाद देखील दिले. गरीब शेतकऱ्यासाठी पंधरा लाखाची ही रक्कम खूप मोठी होती. या शेतकऱ्याने पंधरा लाखातील नऊ लाखांची रक्कम काढली आणि एक घर देखील बांधले. मोठ्या आनंदाने तो या घरात राहू लागला पण पुढे घडले ते वेगळेच ! त्याचा हा आनंद अधिक काळ टिकू शकला नाही.
जिल्हा परिषद आणि बँकेचे अधिकारी या शेतकऱ्याचा शोध घेत त्याच्या घरी येऊन धडकले आणि त्यांनी या शेतकऱ्याला हात जोडले. 'तुमच्या खात्यावर चुकून पैसे जमा झाले आहेत तेवढे परत करा' म्हणत हे अधिकारी हात जोडू लागले. ज्ञानेश्वर औटे त्यांच्याकडे पाहतच राहिले. त्याच्या चेहऱ्यावर असलेला आनंद बेपत्ता झाला. खरं तर ज्ञानेश्वर यांनी ही रक्कम जमा झाल्यावर लगेच काढून घेतली नव्हती. काही काळ त्याने वाट पहिली पण कुणी त्यांना या पैशाबद्धल विचारले नाही की त्याच्या खात्यावरील रक्कम परत वळती करूनही घेण्यात आली नाही. वाट पाहून त्याने ९ लाख काढले आणि छानसे घर बांधले होते.
पिंपळवाडी ग्रामपंचायतीच्या खात्यावर जमा करण्याची रक्कम चुकून ज्ञानेश्वर औटे यांच्या खात्यावर जमा झाल्याचे बँक ऑफ बडोदा च्या उशिरा लक्षात आले. आणि मग बँक अधिकारी आणि जिल्हा परिषद यांच्या अधिकाऱ्यांची धावाधाव सुरु झाली. ज्ञानेश्वर औटे यांनी तर त्यातील ९ लाख खर्च करून टाकले होते. उरलेली रक्कम तातडीने वळती करून घेतली आणि आता ९ लाखासाठी अधिकारी औटे यांना विनंती करीत आहेत. एवढी रक्कम कुठून जमा करायची हा प्रश्न औटे यांच्यासमोर पडला आहे !


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !