BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१८ डिसें, २०२१

सोलापूर जिल्ह्याच्या वेशीवर पोहोचला ओमीक्रॉन !

 




पंढरपूर : कोरोनाने पंढरपूर तालुक्याचे प्रचंड नुकसान केले असून कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमीक्रॉन आता सोलापूर जिल्ह्याच्या आणि माळशिरस, पंढरपूरच्या वेशीवर पोहोचला असून आता अधिक सतर्क होण्याची वेळ आली आहे. 


दोन वर्षांपूर्वी  कोरोनाचा प्रादुर्भाव देशात सुरु झाला तेंव्हा पंढरपूर तालुक्यात त्याचे आस्तित्व नव्हते पण त्यानंतर आजूबाजूची शहरे व्यापत तो वाडी वस्त्यांवर अत्यंत वेगाने पोहोचला आणि मग त्यावर नियंत्रण आणणे जिकिरीचे बनून गेले होते. कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या सुरुवातीला नागरिकांनी कोरोनाला गंभीरपणे न घेतल्याचे मोठे नुकसान सोसावे लागले आहे. दुसरी लाट तर भयानक होती आणि या लाटेत सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान पंढरपूर तालुक्याचे झाले आहे. बाधित रुग्णांची संख्या आणि कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या जिल्ह्यात पंढरपूर तालुक्यातच सर्वाधिक आहे. प्रशासन सतत आवाहन करीत असतानाही अजूनही काही लोक कोरोना प्रतिबंधात्मक नियमांकडे सोईस्करपणे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसत आहे पण आता तर हा नवा ओमीक्रॉन  पंढरीच्या वेशीपर्यंत आलेला आहे. मागील दोन लाटांचा विचार करून नागरिकांनी अत्यंत सतर्क होण्याची ही वेळ आहे. 


महाराष्ट्रात ओमीक्रॉन चे रुग्ण देशाच्या तुलनेत सर्वाधिक आहेत पण काही जिल्ह्यातच त्याचे आस्तित्व दिसून आले होते. आता हा ओमीक्रॉन  राज्याचे विविध विभाग व्यापताना दिसू लागले आहे. सोलापूर जिल्ह्याला लागून असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यात ओमीक्रॉन  रुग्ण आढळून आला होता. पुणे, पिंपरी, उस्मानाबाद या जवळच्या भागात ओमीक्रॉनचे रुग्ण आढळले असून अद्याप सोलापूर जिल्हा यापासून दूर आहे पण आज पंढरपूर, माळशिरस तालुक्याच्या निकट असलेल्या फलटणमध्ये ओमीक्रॉनचे तीन रुग्ण आढळले आहेत.  हळूहळू हा ओमीक्रॉन आपले क्षेत्र वाढवत निघाला असून सोलापूर आणि सातारा जिल्हा परस्परांना लागून आहेत. त्यातही फलटण अधिक जवळचे शहर आहे.  परदेशातून फलटण तालुक्यात मागील महिन्यात २८ व्यक्ती आलेल्या होत्या, त्यातील १६ व्यक्ती शहरात तर १२ व्यक्ती फलटण तालुक्याच्या ग्रामीण भागात पोहोचल्या होत्या. फलटण शहरात आलेल्या पती, पत्नी आणि त्यांची दोन मुले यांची कोरोना चाचणी करण्यात आली आणि या तपासणीत त्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. आफ्रिका खंडातून युगांडा येथून हे कुटुंब फलटण येथे ९ डिसेंबर रोजी आले होते. खबरदारीचा उपाय म्हणून ही तपासणी करण्यात आली होती.  आता पती पत्नी आणि दोन मुले या चौघांपैकी तिघांची ओमीक्रॉन तपासणी पॉझिटिव्ह आल्याने सातारा जिल्ह्यात ओमीक्रॉनचा प्रवेश झाला आहे. 


या कुटुंबाची कोरोना तपासणी झाल्यानंतर ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल प्राप्त होताच त्यांची ओमीक्रॉन चाचणी करण्यासाठी नमुने पुणे येथे पाठविण्यात आले होते. यातील तीन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत त्यामुळे फलटण आणि  सातारा जिल्हा हादरला आहे. या घटनेने फलटणकर चिंतातुर दिसू लागले आहेत तर प्रशासन अधिक सतर्क झाले आहे. नागरिकांनी काळजी करण्यापेक्षा काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. पॉझिटिव्ह आलेल्या तिघांना कसलाही त्रास अथवा लक्षणे जाणवत नाहीत परंतु अहवाल मात्र पॉझिटिव्ह आहेत. फलटण शहरात ओमीक्रॉनचे रुग्ण आढळले असले तरी नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप यांनी केले आहे. प्रशासन सतर्क असून सर्व आवश्यक त्या उपाययोजना राबविल्या जात आहेत. संसर्ग पसरू नये यासाठी नागरिकांनी नियमनाचे पालन करावे तसेच परदेशातून कुणी आल्याची माहिती मिळाल्यास प्रशासनाला कळवावे असे आवाहनही त्यांनी केले आहे. 


हे देखील वाचा : >>> अखेर ती सापडली ! सोलापूर पोलिसांना दोन वर्षे देत होती गुंगारा !


फलटण शहराला लागूनच सोलापूर जिल्हा आणि सोलापूर जिल्ह्यातील नातेपुते आहे. फलटण आणि माळशिरस तालुका परस्परांना लागून असून फलटण शहराशी सोलापूर जिल्हयातील नागरिकांचा नित्याचा संपर्क असतो. आता तर सोलापूर जिल्ह्याच्या वेशीवर ओमीक्रॉन आढळून आला असून एका शहरात तब्बल तीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. कोरोनाच्या सुरुवातीलाही अशाच प्रकारे कोरोना हळूहळू एकेक तालुका व्यापत वाडी वस्त्यांवर पोहोचला होता. त्यामुळे नागरिकांनी वेळीच दक्ष राहून अखंड सतर्क राहण्याची वेळ आली आहे. 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !