शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केले होते जीव देणारे असे कट्टर शिवसैनिक! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी शिवसैनिकाने गमावला आपला जीव !
बीड : शिवसेनेचे कार्याध्यक्ष आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीसाठी नवस केलेल्या निष्ठावंत शिवसैनिकाचा अर्ध्या वाटेवरच दुर्दैवाने मृत्यू झाला. या घटनेने शिवसैनिकांत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
शिवसेनेसाठी प्राणाची पर्वा न करणारे शिवसैनिक शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केले होते. बाळासाहेब ठाकरे यांच्यासाठी तर शिवसैनिक आपला प्राण तळहातावर घेऊन सदैव सज्ज असायचे. अशाच एका निष्ठावान शिवसैनिकाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी आपले बलिदान दिले आहे. संपूर्ण महाराष्ट्र या शिवसैनिकाच्या निष्ठेला मुजरा करू लागला आहे. राजकीय पक्षात स्वार्थ साधणाऱ्या संधीसाधुंची गर्दी असते. फायदा आणि पद यासाठी अनेकजण निष्ठेचा मुखवटा लावतात आणि स्वार्थ साधत असतात. शिवसेनेला तर गद्दारांचा प्रचंड मोठा अनुभव आहे. शिवसेनेच्या नावावर मोठे व्हायचे, पदे भोगायची आणि पुन्हा उलट्या तंगड्या करायच्या, अशा प्रवृत्ती शिवसेनेच्या वाट्याला मोठ्या प्रमाणात आल्या पण शिवसेनेने अशा लबाडांची कधीच पर्वा केली नाही. अशा गद्दारांच्या गर्दीत सुमंत रुईकर यांच्यासारखे शिवसैनिक उजळून निघाले आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे गेल्या काही काळापासून आजारी आहेत, त्यांच्यावर शस्त्रक्रियाही झाली आहे. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी आणि त्यांना दीर्घायुष्य लाभावे म्हणून बीड येथील शिवसैनिक सुमंत रुईकर यांनी बीड ते तिरुपती अशी पायी यात्रा काढली पण या यात्रेतच त्यांचे निधन झाले. बीड येथील माजी नगरसेवक असलेले सुमंत रुईकर हे बीडपासून तिरुपती पर्यंत पायी चालत निघाले होते परंतु त्यांची ही यात्रा सुरु असतानाच कर्नाटकमध्ये रायचूर येथे त्यांची प्रकृती बिघडली आणि यातच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बीड ते तिरुपती असा अकराशे किलोमीटर पायी चालत जाऊन तिरुपतीला साकडे घालण्याचा त्यांचा संकल्प होता. तिरुपतीचा पायी प्रवास सुरु असताना त्यांना दोन तीन दिवसांपासून ताप येत होता. सुमंत रुईकर आणि त्यांचे सहकारी श्रीधर जाधव यांनी १ डिसेंबर रोजी हा प्रवास सुरु केला होता. सव्वा पाचशे किमी अंतर चालून गेल्यावर त्यांची प्रकृती बिघडली आणि त्यांना रुग्णालयात दाखलही करण्यात आले होते.
उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री व्हावेत म्हणून रुईकर यांनी २०१९ मध्ये अशीच बीड ते तिरुपती पदयात्रा केली होती यावेळी उद्धव ठाकरे यांनी देखील त्यांच्या निष्ठेला धन्यवाद दिले होते. कट्टर शिवसैनिक रुईकर यांच्या अशा जाण्याने प्रचंड हळहळ व्यक्त होत असून आता रुईकर यांच्या कुटुंबाची जबाबदारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येऊ लागली आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !