मंगळवेढा : विषबाधा होऊन दोन चिमुकल्या मुलींचा प्राण गेल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील दोघाविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून दुग्धजन्य पदार्थातून ही विषबाधा झाली असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
मंगळवेढा तालुक्यातील मरवडे येथे विषबाधेची घटना घडून दोन चिमुकल्या आणि सख्ख्या बहिणींना आपले प्राण गमवावे लागल्याची घटना नुकतीच घडली होती आणि या घटनेने सोलापूर जिल्हा हळहळला होता. मरवडे येथील आबासाहेब चव्हाण यांच्या कुटुंबातील काही जणांना विषबाधा झाली होती. चव्हाण यांनी मंगळवेढा येथून श्री समर्थ डेअरी येथून श्रीखंड, बासुंदी, रबडी, पनीर असे पदार्थ घरी आणले होते. ते खाल्ल्यानंतर आबा चव्हाण, त्यांची पत्नी सुषमा चव्हाण, त्यांची सहा वर्षे वयाची मुलगी भक्ती आणि चार वर्षे वयाची मुलगी नम्रता, आबासाहेब चव्हाण यांचे वडील दगडू चव्हाण (वय ७०) उलट्या जुलाबाच त्रास होऊ लागला. मळमळ होऊन पोटात दुखू लागले त्यामुळे तातडीने ते मंगळवेढा आणि पंढरपूर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले. दुर्दैवाने उपचार सुरु असताना भक्ती आणि नम्रता या दोन सख्ख्या बहिणींचा विषबाधेने मृत्यू झाला. या घटनेने मरवडे गावासह मंगळवेढा तालुक्यात शोकाकुल वातावरण झाले.
सदर प्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी उमेश भुसे यांनी मंगळवेढा पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी दोन विक्रेत्यांवर गुन्हा दाखल केला आहे. मंगळवेढा येथल श्री समर्थ डेअरीचे संतोष लहू कोंडूभैरी आणि आकाश धोंडीराम फुगारे यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर विषबाधा ही दुग्धजन्य पदार्थातून झाली असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले आहे त्यामुळे या विक्रेत्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ कलम व नियमन २०११ चे उल्लंघन झाले म्हणून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाचा : पंढरीत पुन्हा चोरी, नागरिक भयभीत !

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !