BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२६ डिसें, २०२१

मद्यप्राशन करून वेडीवाकडी दुचाकी चालविणाऱ्याना पोलिसांचा दणका !

 



पंढरपूर : मद्यप्राशन करून दुचाकी वेडीवाकडी चालविणाऱ्या दोघांना पोलिसांनी चांगलीच अद्दल घडवली असून दोघांवर थेट गुन्हे दाखल केले आहेत.

पंढरपूर शहरात वाहतुकीला कधीच शिस्त नसते आणि वाहन चालविणाऱ्याला वाहतुकीचीही एक शिस्त असते याची माहिती नसावी असे चित्र अनेकदा दिसते. रस्ता केवळ आपल्यासाठीच आहे आणि या रस्त्यावर फक्त आपणच वाहन चालवत आहोत असा समाज काही वाहनचालकांनी करून घेतलेला दिसतो. आपल्या वाहन चालविण्याच्या पद्धतीमुळे इतरांना त्रास होऊ शकतो, अपघातही होऊ शकतो याची जाणीवही या बहाद्दरांना नसते. वाहतुकीचे नियम तर यांच्या कल्पनेतही नसतात त्यामुळे रस्त्यावर अनेक समस्या निर्माण होत असतात आणि पादचाऱ्यानाही याचा मोठा फटका बसत असतो.  हे कमी म्हणून की काय, मद्यप्राशन करून वेडीवाकडी वळणे घेत वाहन चालविणाऱ्या नमुन्यांचीही पंढरीत कमी नाही. 

मद्यप्राशन करून रस्त्यावरून 'लेझीम' खेळत जाणारे अनेकजण दिसतात पण तरर्र होऊन दुचाकी चालविण्याचा पराक्रमही अनेकजण करीत असतात. यांच्या वेडीवाकडी गाडी चालविण्यामुळे इतर वाहनांना त्रास होतोच पण पादचाऱ्याला इजा होण्याची भीती नेहमीच असते. अशाच प्रकारे दुचाकी चालवत असलेल्या दोघावर पंढरपूर पोलिसांनी थेट गुन्हा दाखल केला आहे. जगदंबा नगर, पंढरपूर येथे राहणारा तुषार सुर्यकांत खेंडकर आणि पद्मावती गार्डन येथे राहणारा रामा भास्कर पवार या दोघांवर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाजवळ रात्रीच्या साडे सात वाजण्याच्या सुमारास रामा पवार हा वेडीवाकडी दुचाकी चालवताना पोलिसांना आढळून आला. एम एच १३ डी सी ९६८९ या क्रमांकाची दुचाकी घेऊन ती वेडीवाकडी चालवत होता. 

नागरिकांची वर्दळ असलेल्या रस्त्यावर वेडीवाकडी दुचाकी चालवताना दिसल्याने पोलिसांनी त्याला हटकले आणि चौकशी केली. यावेळी त्याच्या तोंडाला आंबट, उग्र वास येऊ लागल्याने त्याने मद्यप्राशन केल्याची जाणीव पोलिसांना झाली. त्याला पोलीस ठाण्यात नेऊन मशीनच्या सहाय्याने तपासणी केली असता त्याने मद्यार्काचे सेवन केल्याचे आढळून आले. त्यामुळे पोलिसांनी रामा पवार याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. जगदंबा नगर येथे राहणारा तुषार खेंडकर हा उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या कार्यालयाच्या समोरील रस्त्यावर अशाच प्रकारे आढळून आला.  दुचाकी (एम एच १३ सी सी ७३५३) वेडीवाकडी चालवत निघालेल्या खेंडकर यास पोलिसांनी रोखले आणि चौकशी केली. यावेळी हा देखील मद्यप्राशन करून दुचाकी चालवत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्याचीही तपासणी केली असता मद्यार्काचे सेवन केल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्याच्या विरोधातही पंढरपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

वाहतुकीचे नियम कितीही कडक केले आणि दंडाच्या रकमेत मोठी वाढ केली असली तरी काहींनी नियम पाळायाचेच नाहीत असा विडा उचललेला असल्याचे रस्त्यारस्त्यावर दिसून येते. पंढरपूर शहरात अनेक अल्पवयीन मुले दुचाकी आणि रिक्षाही चालवताना दिसतात. अशा बहाद्दर चालकांच्या विरोधातही पोलिसांनी कडक कारवाई करावी अशी मागणीही नेहमीच होत असते. 

बाप रे ! कपडेच पळवले !
पंढरपूर शहर आणि उपनगरी भागात अलीकडे चोऱ्यांचे प्रमाण अधिक वाढलेले आहे. नागरिक घरात नाहीत हे दिसले की त्याचे घर फोडले जात आहे, भाविकही असुरक्षित बनला आहे. आता तर चक्क कपड्यांच्या दुकानातून कपडेच लांबविल्याचा प्रकार समोर आला आहे. 

शिवाजी चौकात असलेल्या पूजा गारमेंट या दुकानातून कपडे कधी चोरीला गेले हे दुकानदारालाही समजले नाही. अमोल लालबोंद्रे यांनी दुकान नेहमीप्रमाणे सकाळी उघडले आणि माल चेक करू लागले तेंव्हा कपडे बेपत्ता असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. ८४ टॉप आणि २० नाईट पॅन्ट कमी असल्याचे त्यांना दिसून आले. एकूण २० हजार ८०० रुपयांचे कपडे दुकानातून गायब झाले असल्याचे त्यांच्या लक्षात आले. लालबोन्द्रे यांनी याबाबत पंढरपूर शहर पोलिसात तक्रार दिल्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोराच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. 





       


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !