पंढरपूर : सुस्ते येथील शेतकऱ्यास मारहाण केल्याप्रकरणी पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप घाडगे यांच्यासह आठ जणांच्या विरोधात पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ( Pandharpur Crime ) करण्यात आला असून या घटनेची तालुकाभर चर्चा सुरु झाली आहे.
पंढरपूर तालुक्यातील सुस्ते येथे लाठ्या काठ्यांनी आठ जणांनी मारहाण केल्याची फिर्याद सुस्ते येथील एक शेतकरी धनंजय भारत घाडगे यांनी पोलीसात दिली आहे. पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप घाडगे यांनी ही मारहाण केल्याचा आरोप करण्यात आल्याने पंढरपूर तालुक्यात हा चर्चेचा विषय बनला आहे. दिलीप तुकाराम घाडगे यांच्यासहित काही जणांनी लोक जमवून धनंजय भारत घाडगे, त्यांचे चुलते वसंत घाडगे आणि कुटुंबीयास लाठ्याकाठ्यांनी मारहाण केली असल्याची फिर्याद देण्यात आली असून त्यानुसार दिलीप घाडगे यांच्यासह आठ जणांच्या विरोधात पंढरप्रूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी धनंजय घाडगे यांना खाली पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली तसेच डोळ्यास इजा करून काठीने मारहाण करून जखमी करण्यात आले याशिवाय त्यांच्या चार चाकी गाडीच्या काचा फोडून नुकसान करण्यात आले अशा आशयाची फिर्याद असून सुस्ते येथील आठ जणांच्या विरोधात त्यांनी तक्रार केली आहे. यात पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप घाडगे, अभिजित दिलीप घाडगे, सौरभ संजय घाडगे, अनिल तुकाराम घाडगे, सोमनाथ धोंडीराम माने, रवींद्र नारायण जाधव, ऋषीक रवींद्र जाधव यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेताकडे फिरकायचे नाही अन्यथा जिवंत सोडणार नाही अशी धमकी देत आपणास मारहाण केली असल्याचा आरोप फिर्यादी धनंजय घाडगे यांनी केला आहे. आपणास खाली पाडून काठीने, दगडाने आणि हाताने मारहाण केली. आपल्या वडिलार्जित जमिनीत दिलीप घाडगे हे येवू देत नाहीत, त्यांनी तेथे अतिक्रमण केलेले आहे, माझ्याच क्षेत्रात मलाच येऊ दिले जात नाही आणि आलाच तर तुला बघून घेतो अशा धमक्या दिल्या जात आहेत. १६ मार्च रोजी शेतात गेलो असता आपणास मारहाण केली त्यामुळे आपला हात फ्रॅक्चर झाला असून डोळ्यालाही मार लागलेला आहे. तीन दिवस सोलापूर येथे शासकीय रुग्णालयात उपचार घेतले आहेत. (A case has been registered against Dilip Ghadge for assault) बऱ्याच दिवसांपासून आपल्यावर अन्याय सुरु असून आपणास न्याय मिळावा अशी अपेक्षा आहे असे धनंजय घाडगे यांनी सांगितले.
जीविताला धोका !
दिलीप घाडगे हे पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती (Pandharpur Agricultural Produce Market Committee) असून राजकारणात त्यांचा दबदबा आहे शिवाय त्यांच्या भोवती अवैध वाळू व्यवसाय करणाऱ्यांचा गराडा असतो त्यामुळे भविष्यात आपणास आणि आपल्या कुटुंबास त्यांच्यापासून धोका होऊ शकतो अशी भीती देखील धनंजय घाडगे यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान पोलिसांनी या प्रकरणी चार जणांना ताब्यात घेतले असून दिलीप घाडगे यांच्यासह अन्य चार जणांचा शोध पोलीस घेत आहेत.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !